बेळगाव जिल्हाधिकारी (डीसी) कार्यालय परिसरातील धरणे सत्याग्रह वगैरे आंदोलनासाठी वापरल्या जाणाऱ्या खुल्या मोकळ्या जागेचा जनतेसाठी सदुपयोग करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घेतला असून या जागेत निदर्शन स्थळ, पे पार्किंग सोय आणि कार्यालयात येणाऱ्या जनतेसाठी खाऊ कट्टा निर्माण केला जाणार आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बरीचशी जागा रिकामी असून देखील या परिसरात नेहमी पार्किंगची समस्या निर्माण होत असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी येणारे आंदोलनकर्ते पान, गुटखा खाऊन सर्वत्र थुंकण्याबरोबरच गुटख्याची रिकामी पाकिटे इतस्ततः फेकून अस्वच्छता निर्माण करत असतात.
या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आसपास असणाऱ्या खुल्या जागेचा जनतेसाठी सदुपयोग करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घेतला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्या अनुषंगाने आज गुरुवारी सकाळी त्यांनी रहदारी विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांना जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बोलावून घेऊन परिसराची पाहणी केली. तसेच आपली योजना गडादी यांच्यासमोर मांडून ती अंमलात आणण्याच्या दृष्टीकोनातून पोलीस उपायुक्त गडाद त्यांच्याशी चर्चा केली.
सरकारी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांकरिता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील खुल्या रिकामी जागेत निदर्शनास स्थळ पे -पार्किंगची सोय करण्याचा तसेच खाऊ कट्टा निर्माण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मनातील ही योजना साकारण्यासाठीच कांही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आवारात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. येथील दुकानाची खोकी आणि चहाच्या टपऱ्या हटविण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी आवार सध्या मोकळा श्वास घेत आहे.