गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा सुरु नव्हत्या. ऑनलाईन क्लास जरी सुरु असले तरी शाळेतील ती मजा विद्यार्थ्यांना अनुभवता आली नाही.
अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शाळेसाठीच प्रवेश घेऊन आपले शैक्षणिक वर्ष सुरु करावे लागले. मात्र यंदा कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने शाळा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत.
यंदा उन्हाळी सुट्ट्या कमी करून १५ दिवस आधीच म्हणजेच १६ मे पासून शाळांना सुरुवात करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र दरवर्षी १ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने यंदा विद्यार्थ्यांची म्हणावी तशी उपस्थिती शाळेत दिसून आली नाही. १५ दिवस विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असून देखील वर्ग भरविण्यात आले होते. मात्र आजपासून बेळगावमधील प्रत्येक शाळेचा आवार गजबजलेला दिसून आला.
अंकुर, शिशु, बालवाडी साठी प्रवेश घेतलेल्या बालविद्यार्थ्यांचीही आज रेलचेल दिसून आली. नवा गणवेश नवे दप्तर आणि नवीन अनुभव घेण्यासाठी सज्ज असलेले बालचमू आज शालेय परिसरात पालकांसमवेत दिसून आले. अनेक शाळेतून आज विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. तर अनेक शाळेतून आकर्षक सजावटीने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात शालेय वातावरणाचा अनुभव न घेतलेल्या विद्यार्थ्यांना यंदा मात्र मोठ्या उत्साहात शाळेला जाण्याची इच्छा झालेली त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होती. शालेय परिसर विद्यार्थी आणि पालकांनी गजबजलेला दिसून आला. एकंदर आज बेळगावमधील शाळांमध्ये पुन्हा एकदा वर्ग भरण्यास सुरुवात झाली असून यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी इतर वर्षांपेक्षा नक्कीच वेगळी ठरली आहे.