कपाळाला टिळा, गळ्यात तुळशीमाळ , खांद्यावर भगवी पताका (ध्वज) डोक्यावर तुळशी वृंदावन व मुखाने हरिनाम म्हणत शनिवारी 25 जून रोजी निलजी ता. बेळगाव येथील 125 हून अधिक विठ्ठलाचे वैष्णव भक्त (वारकरी मंडळी) आज पायीदिंडीच्या माध्यमातून पंढरपूर कडे रवाना झाले. तब्बल १६ दिवस हा पायी प्रवास झाल्यानंतर ही वारी आषाढीला पंढरपूर मध्ये दाखल होते.
दररोजच्या मार्गक्रमणात पहाटे ४ वा. उठून शुचिर्भूत होउन अंघोळ चहा,नास्ता झाल्यावर मग मार्गक्रमणाला सुरुवात होते.दिंडीतले वारकरी रोज सुमारे २५ ते ३० किलोमीटरचे अंतर चालतात.
दिंडीचा मुक्काम रस्त्यातील एखाद्या गावात असतो. तेथे त्या गावातील कुटुंबे या वारकऱ्यांच्या चहा नास्ता व जेवणाची सोय करतात. वारकऱ्यांची सोय करणे म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाची सेवा करणे, असा समज आहे.वारीत गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव नसतो.
वारी केल्याने अहंकार गळून पडतो असा समज आहे. गेल्या कित्येक वर्षांची निलजीकरांची परंपरा आजही कायम आहे. देहू इथून निघणाऱ्या तुकाराम महाराज यांच्या दिंडी सोहळा व आळंदीहून निघणार्या ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडी सोहळ्यातही येथील भाविक सहभागी झालेले असतात. दिवेघाट येथील सुमारे ४किलोमीटर अंतराचा खडतर प्रवास अतिशय विलोभनीय असतो. देहभान विसरून असंख्य वारकरी विठुरायाचा गजर करत येत असताना दिसत असतात.
निलजीतील सर्व भक्तांचे सोय व्हावी यासाठी श्री राम मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने अतिशय सुसज्ज असे निवासस्थान बांधण्यात आलेले आहे. यावर्षी विस्तारित जागेत बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे. यावेळी देणगीदारांचा द्ददसत्कारही आयोजित करण्यात आलेला आहे.