सध्या ज्या ईजीआयएस या ठेकेदार कंपनीकडे बेळगाव शहराचा मास्टर प्लॅन (सीडीपी) तयार करण्याचा ठेका आहे. मात्र आता हा ठेका रद्द केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शहराचा नवा मला मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी नवा ठेकेदाराची नियुक्त करण्यात येणार असून त्यासाठी राज्य शासनाकडूनच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे समजते.
नव्या ठेकेदारासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यास शहराचा नवा मास्टरप्लॅन तयार होण्यास विलंब लागणार आहे. शिवाय मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी आतापर्यंत खर्ची घातलेल्या 3 वर्षाचा कालावधी देखील वाया जाणार आहे. शहराच्या मास्टर प्लॅनचे काम केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून हाती घेण्यात आले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी नगरविकास मंत्र्यांनी 31 ऑगस्ट 2022 ची डेडलाईन दिली होती. तथापि सध्या कार्यरत ईजीआयएस कंपनीने थकित बिलाच्या मागणीसाठी त्याआधीच म्हणजे गेल्या तीन महिन्यापासून मास्टर प्लॅनचे काम थांबविले आहे.
बेळगावातील त्यांचे कार्यालय देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळेच नगर विकास मंत्री बैराती बसवराज यांनी या कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते.
याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्याचप्रमाणे नव्या ठेकेदाराच्या नियुक्तीसाठी अद्याप निविदा प्रक्रियाही राबविण्यात आलेली नाही. ईजीआयएस कंपनीकडे बेळगावसह हुबळी -धारवाड व गदग या शहरांच्या मास्टर प्लॅन निर्मितीचा ठेका आहे.
त्यामुळे ईजीआयएस कंपनीचा ठेका रद्द झाल्यास या तीनही शहरांच्या मास्टर प्लॅनचे काम नव्याने करावे लागणार आहे. परिणामी शहराचा नवा मास्टरप्लॅन तयार होण्यास आणखी विलंब लागणार आहे.