बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवासी वाहतुकीमध्ये अडचणी निर्माण होत असल्याने सरकारने 2,800 नवीन बसेस खरेदी करण्यासाठी 931 कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी राज्य परिवहन महामंडळाने केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडे अपुऱ्या बसेस असल्यामुळे प्रवासी वाहतुकीला अडचणी येत आहेत. जवळपास सर्वच आगारांकडून 9.3 लाख किलोमीटरचा प्रवास केलेल्या जुन्या बसेस वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत.
आयुष्यमान संपलेल्या बसेस रस्त्यावर धावत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. साधारण 15 वर्षे वापरलेल्या बसगाड्या मुदत संपल्याने भंगारात काढल्या जातात. मात्र बसेसचा तुटवडा असल्याने नाईलाजाने अद्यापही बऱ्याच जुन्या बसेस रस्त्यावरून धावत आहेत. या बसगाड्यांमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
परिवहन महामंडळाच्या ताब्यात जुन्या बसेसचा भरणा अधिक असल्याने कांही मार्गावर बसफेऱ्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे अद्यापही कांही मार्गांवर बससेवा पूर्ववत झालेली नाही.
त्यामुळे परिवहन ताफ्यात नवीन बसेस दाखल होणे गरजेचे आहे, असे राज्य परिवहन महामंडळाचे मत आहे. यासाठीच महामंडळाने 2,800 नवीन बसेस खरेदी करण्यासाठी 931 कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.