” देशाचा विकास सर्वसमावेशक व्हायचा असेल तर सहकार क्षेत्राच्या शिवाय तो शक्य नाही या देशाच्या विकासात शेड्युल्ड आणि अर्बन बँकांचे योगदान फार मोठे आहे. तुम्ही शंभर वर्षे टिकून आहात हेच तुमच्या कर्तुत्वाचे गुपित आहे .पण आपल्याला येथे थांबून चालणार नाही पुढची शंभर वर्षे कशी प्रगती करता येईल त्याचा विचार करावयाची गरज आहे” असे विचार भारताचे सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बोलताना व्यक्त केले.
नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात शंभर वर्षे पूर्ण केलेल्या देशातील अनेक बँकांच्या चेअरमनांचा शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
शंभर वर्षे पूर्ण केलेल्या बेळगाव पायोनियर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर व सहकाऱ्यानाही यावेळी गौरविण्यात आले.
सकाळच्या सत्रात निवडक अशा 5 बँक चेअरमन यांचा तर सायंकाळच्या सत्रात राजमंत्री बी एल वर्मा आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात अर्बन को-ऑपरेटिव बँक चे राष्ट्रीय फेडरेशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फेडरेशनचे अध्यक्ष ज्योतींद्रभाई मेहता यांनी यावेळी सांगितले की, देशामध्ये एकूण 1534 अर्बन सहकारी बँका असून एक लाख अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी आहेत. शंभर वर्षे पूर्ण केलेल्या एकूण 688 बँका असून त्यामध्ये 195 अर्बन सहकारी बँक आहेत.
तामिळनाडूमध्ये 85 तर त्याखालोखाल कर्नाटकात 42, महाराष्ट्रात 20 बँकानी शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. बेळगाव मध्ये पायोनियर अर्बन बँक ही शंभर वर्षे पूर्ण केलेली एकमेव बँक आहे पायोनीयर बँकेचे चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांच्या समवेत व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील, संचालक अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील ,सौ सुवर्णा शहापूरकर यांच्यासह सीईओ अनिता मूल्या आदी उपस्थित होते.
या एकदिवशीय कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये अर्बन बँकांचा भविष्यातील सहभाग, बँकिंग रेगुलेशन ॲक्ट, क्रेडिट सोसायटीचे योगदान आणि सहकारी सोसायटी यावरील कर याबाबत चर्चा करण्यात आली .देशाच्या विविध भागातून सुमारे दोन हजार बँक प्रतिनिधी सहभागी झालेल्या या अधिवेशनात फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपभाई सिंघानी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतिश मराठे यांनीही मार्गदर्शन केले