केएलई विश्वविद्यालय, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्र, जे. एन. मेडिकल कॉलेज बेळगाव आणि अनिल बेनके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मतदार संघात आयोजित बृहत् मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा आज शनिवारी दुपारी उस्फुर्त प्रतिसादात पार पडले.
रुक्मिणीनगर सरकारी शाळेच्या आवारात आयोजित केलेल्या सदर शिबिरांचे उद्घाटन उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते आज सकाळी फीत कापून करण्यात आले. त्याप्रमाणे दीपप्रज्वलनाने शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटन समारंभनंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना आमदार ॲड. बेनके म्हणाले, आज रुक्मिणीनगर येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . याच पद्धतीने दर आठवड्याला बेळगाव उत्तर मतदार संघातील वेगवेगळ्या भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी केएलई संस्थेचे अध्यक्ष प्रभाकरराव कोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सदर आरोग्य तपासणी शिबिरात सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया नेत्र, त्वचा, नाक-कान-घसा, रक्तदाब, मधुमेह यासारख्या अनेक तपासण्या केल्या गेल्या आहेत असे आमदार बेनके यांनी सांगितले.
पुढील आठवड्यात चव्हाट गल्ली, त्या पुढील आठवड्यात सदाशिवनगर, हनुमाननगर, नेहरूनगर, रामतीर्थनगर, भांदुर गल्ली आदी उत्तर मतदार संघातील 14 ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराची तारीख निश्चित करण्यात आली असून ती लवकरच जाहीर केली जाईल. तेंव्हा या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्याव्या, असे आवाहन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले आहे.
स्थानिक नागरिकांनी देखील यावेळी होताना मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या या उपक्रमाबद्दल प्रशंसोद्गार काढले. उद्घाटनानंतर आमदार ॲड. बेनके यांनी कांही काळ शिबिरात थांबून कामकाजाची पाहणी केली.
रुक्मिणीनगर सरकारी कन्नड शाळेच्या आवारात आयोजित आजच्या शिबिरात केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना सल्ला दिला. सदर शिबिराचा रुक्मिणीनगर परिसरासह शहरातील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला.