भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जवान जागीच ठार झाल्याची घटना हालगा गावानजीकच्या महामार्गावर मंजुनाथ राईस मिल जवळ गुरुवारी दुपारी 3:30 वा. सुमारास घडली.
अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी जवानाचे नांव प्रकाश मडिवाळप्पा संगोळी (वय 28, रा. होसुर, ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) असे आहे. प्रकाश हे बेळगावहून बैलहोंगल रस्तामार्गे आपल्या गावी निघाले होते.
महामार्गावर आले असता बेळगावहून हिरेबागेवाडीकडे जाणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की प्रकाश संगोळी हे रस्त्यावर कोसळून जागीच गतप्राण झाले.
अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिंन्नूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याबरोबरच जवानाचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे रवाना केला.
याप्रकरणी मृत प्रकाश यांच्या भावाने हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवान प्रकाश संगोळी हे आपल्या पत्नीच्या चोळी कार्यक्रमासाठी गावी रजेवर आले होते.