मराठी भाषिकांना त्यांच्या भाषिक अधिकारापासून डावलले जात असल्याच्या निषेधार्थ तसेच सरकारी कागदपत्रे मराठीतून मिळावीत या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो मराठी भाषिकांचा भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. आजच्या मोर्चाने पुन्हा एकदा बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांच्या शक्तीचे विराट दर्शन घडविले.
समितीच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी शहरातील सरदार हायस्कूल मैदानावरून काढण्यात आलेल्या या मोर्चात बेळगाव, खानापूर आणि निपाणी येथील मराठी भाषेत बहुसंख्येने सहभागी झाले होते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, बेळगाव तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर तालुका युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, म. ए. समिती महिला आघाडीच्या अध्यक्ष माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आदी नेत्यांसह मध्यवर्ती म. ए. समिती, शहर समिती, बेळगाव व खानापूर तालुका म. ए. समिती, महिला आघाडी,युवा आघाडी, शिवसेना, श्रीराम सेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
मोर्चाच्या अग्रभागी भगव्या ध्वजाखाली मध्यवर्ती म. ए. समिती, बेळगाव तालुका म. ए. समिती, खानापूर तालुका म. ए. समिती यांच्या बॅनरसह मराठी परिपत्रके मिळावीत या मागणीचे बॅनर कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. मोर्चातील बेळगावसह सीमाभागातील शेकडो मराठी भाषिकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षवेधी होता. बेळगाव व तालुक्यासह खानापूर व निपाणी परिसरातील युवा कार्यकर्त्यांसमवेत वयस्कर नागरिक देखील हिरिरेने आजच्या या मोर्चात सहभागी झाले होते.
सरदार स्कूल मैदानावरून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में, मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार असो! आदी घोषणा मोर्चादरम्यान दिल्या जात होत्या. यावेळी हातात भगवा ध्वज फडकवत देण्यात येत असलेल्या घोषणांमुळे मोर्चाचा मार्ग दणाणून गेला होता. सरदार मैदानावर निघालेला हा मोर्चा कॉलेज रोड, कित्तूर चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दळवी आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी भाषिक अल्पसंख्यांक कायदा तसेच भाषिक अल्पसंख्यांक असणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी कागदपत्रे परिपत्रके मराठीतून मिळावीत या आपल्या मागणीबाबत माहिती दिली.
मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाच्या दुतर्फा पोलीस तैनात करण्यात आले होते. सदर मोर्चा निघू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करून देखील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांनी आजचा मोर्चा शांततेत यशस्वी करून दाखविला.