यंदा मान्सून पूर्व पावसामुळे मोठी हानी झाली असून कृषी व बागायत मिळून बेळगाव जिल्ह्यात 11.70 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या खेरीज 6 जणांचा वेगवेगळ्या कारणाने बळी गेला आहे.
बेळगाव जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतोनात हानी झाली आहे. लाॅक डाऊनच्या काळात पिकाला योग्य भाव मिळाला नाही. आता यंदा मान्सूनपूर्व पावसामध्ये पीक हानी झाली असून 7200 हेक्टर जमिनीतील विविध बागायत पिकांचे नुकसान झाले आहे.
बेळगाव तालुक्यातील मका, पेरु व आंबा मिळून 15 लाखांची हानी झाली आहे. त्याचप्रमाणे सौंदत्ती, रामदुर्ग, कित्तूर, बेळगाव, चिक्कोडी, मुडलगी, खानापूर व रायबाग तालुक्यातील 33 हेक्टर क्षेत्रातील केळी, टरबूज, कलिंगड टोमॅटो आदी पिकांचे 40 लाखाचे नुकसान झाले आहे.
याखेरीज 266 हेक्टर जमिनीतील कृषी पिकांची हानी झाली आहे. यामध्ये तालुक्यातील मका आणि रामदुर्ग तालुक्यातील कापूस पिकाचा समावेश आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांनी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 5 जण वीज पडून मृत्युमुखी पडले आहेत. एकाचा झाड कोसळल्याने मृत्यू झाला आहे.
वादळी पावसामुळे जिल्ह्यातील 1500 हून अधिक वीज खांब आणि 500 हून अधिक ट्रांसफार्मरचे नुकसान झाले आहे. मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढल्यामुळे संयुक्त सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये कृषी विभाग, बागायत, हेस्कॉम, महसूल आणि ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. या सर्वांच्या समितीने दोन आठवड्यानंतर वरील प्रमाणे आपला अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.