एज्युकेशन इंडिया या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका असलेल्या बेळगावच्या डॉ. लक्ष्मी खिलारी यांना जगातील सर्वोत्तम शैक्षणिक पद्धती असलेल्या जपानमध्ये सर्वसमावेशक अभ्यासासाठी निमंत्रित करण्यात आले असून ही बेळगावसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
लहान मुले जोपर्यंत वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्यांची चांचण्या व्यतिरिक्त शालेय परीक्षा घेतली जात नाही अशा जपानमध्ये तेथील शालेय शिक्षणाच्या मूलभूत घटकांचा अभ्यास करण्यासाठी दक्षिण आशियातील 25 शिक्षण तज्ञांची निवड करण्यात आली आहे.
या शिक्षण तज्ञांच्या तुकडीचे नेतृत्व डॉ. लक्ष्मी खिलारी या करणार आहेत. असे मानले जाते की मुलांच्या जीवनातील शाळेची पहिली 3 वर्षे त्यांचे ज्ञान अथवा ती कशी शिकत आहेत? हे तपासण्यासाठी नसतात तर त्यांच्यात उत्तम शिष्टाचार रुजावेत यासाठी असतात. डॉ लक्ष्मी खिलारे यांचे प्राथमिक ध्येय हे आहे की जपानी शिक्षण पद्धतीतील सद्गुण भारतीय शैक्षणिक पद्धतीमध्ये रुजावेत. यासाठी त्या येत्या जुलै महिन्यात भारतातून रवाना होणार असून जपानमधील सर्वोत्तम शाळांना जपानी अधिकार्यांसमवेत जवळपास आठवडाभर भेट देणार आहेत.
विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे एज्युकेशन इंडिया सारख्या मोठ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका असलेल्या डॉ. लक्ष्मी खिलारी या मूळच्या चिक्कोडी सारख्या लहान गावातील आहेत. आज एज्युकेशन इंडिया डॉ. लक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उंचीवर पोहोचली असून भारतासह आखाती देशांमध्ये या संस्थेच्या 300 हून अधिक शाळा कार्यरत आहेत.
आपल्या जपान दौऱ्यामध्ये डॉ. लक्ष्मी खिलारी या भारताच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी जपानच्या शिक्षण, सांस्कृतीक, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.