आपल्या समाजाला 2 -अ वर्ग राखीवता मिळावी यासाठी सरकारकडे मागणी करणारा पंचमसाली लिंगायत समाज हळूहळू एक राजकीय शक्ती म्हणून खास करून कित्तूर कर्नाटक प्रदेशात उदयास येऊ लागला आहे.
राजकीय पक्षांच्या बाबतीत बोलायचं तर विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक आणि वायव्य पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले प्रकाश हुक्केरी आणि हनुमंत निराणी हे दोन्ही आमदार पंचमसाली समाजाचे आहेत.
अवघ्या पाच महिन्यापूर्वी ग्रामीण आमदारांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी विधानपरिषदेच्या वरच्या घरात निवडून गेले आहेत. आता शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील यशामुळे राखीवता मिळविण्यासंदर्भात सरकारशी कठीण सौदेबाजी करण्याच्या दृष्टीने या समाजाचा आत्मविश्वास वाढला आहे.
पंचमसाली समाज पाठीशी असल्यामुळेच काँग्रेस उमेदवार प्रकाश हुक्केरी यांना भाजपचे अरुण शहापूर यांच्यावर 5065 मताने विजय मिळवता आल्याचे दिसून येते. शहापूर हे लिंगायत बनजीगा समाजाचे आहेत. ‘कांही महिन्यापूर्वी चरणराज हट्टीहोळी विजयी झाले. आता मी विजयी झालो आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे की कोणते वारे वाहत आहेत, असे प्रकाश हुक्केरी यांनी आपल्या विजयानंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
राजकीय क्षेत्रात दीर्घकाळापासून बनजीगा समाज आपल्या समाजाला मागे टाकत आला आहे. त्यामुळे लिंगायतांमध्ये लहान असूनही या समाजाकडून पंचमसाली समाजाचा ‘होट बँक’ म्हणून वापर केला जातो, अशी एक खोल भावना पंचमसाली समाजात रुजली आहे.
लिंगायतांमधील सर्व 102 पंथांमध्ये पंचमसाली पंथ हा सर्वाधिक लोकसंख्येचा असला तरी तो राजकीय प्रकाश झोतापासून वंचित राहिला आहे. असे म्हंटले जाते की राखीवते साठी लढा उभारण्याचा मुख्य हेतू हाच आहे की पंचमसाली समाजात जागृती निर्माण व्हावी आणि त्याला राजकीय पटलावर अग्रस्थान मिळावे. त्याअनुषंगाने या निवडणुकीमध्ये हा समाज यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.