पोलीस खात्याशी संबंधित नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने आयोजित खडेबाजार पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील नागरिकांची जनसंपर्क सभा आज दुपारी पार पडली.
समादेवी गल्ली येथील श्री समादेवी मंगल कार्यालय येथे आयोजित या जनसंपर्क सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस उपायुक्त (एसीपी) चंद्रप्पा हे होते. त्याचप्रमाणे ट्रॅफिक एसीपी शरणाप्पा, खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर आणि पोलीस उपनिरीक्षक सौदागर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात सभेचा उद्देश स्पष्ट केला. शहर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे अशा परिस्थितीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांना योग्य माहिती द्यावी, अशी सूचना सभेमध्ये करण्यात आली.
यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित जनतेच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना शहर परिसरात कोणत्याही प्रकारचे योग्य नियोजन आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. शहर व उपनगरात पोलीस दलाने विशेष पाहणी मोहीम सुरू केली आहे. बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्यापारीवर्गाने देखील स्वतः आपले आस्थापन दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत असे सांगून कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे खोट्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे एसीपी चंद्रप्पा यांनी अध्यक्षस्थानावरून स्पष्ट केले.
यावेळी झालेल्या चर्चेत विकास कलघटगी, राम पुजारी, सुनील नाईक, संतोष दरेकर आदींनी भाग घेतला होता. या सर्वांनी पोलीस खात्याशी संबंधित खडेबाजार कार्यक्षेत्रातील समस्या उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सर्वप्रथम रहदारी समस्या निकालात काढावी पार्किंगसाठी भंगी बोळांचा वापर केला जावा. तसेच खासगी जागेतील पार्किंगला प्रोत्साहन दिले जावे. गोवा आणि महाराष्ट्रातून असंख्य लोक खरेदी अथवा अन्य कारणास्तव बेळगाव शहरात येत असतात. पार्किंगच्या समस्येमुळे अलीकडे त्याचे प्रमाण कमी झाले असून याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. मॉरल पोलिसिंग बंद करावी.
रहदारी नियमांसंदर्भात उठ सूट दंड आकारणी करणे बंद करावे. पोलिसांच्या या कारवाईमुळे दंड चुकवण्याच्या नादात वाहने सुसाट हाकण्याच्या प्रवृत्तीमुळे अपघातात वाढ होत आहे हे ध्यानात घ्यावे. पोलिसांनी गंभीर गुन्हा असेल तरच दंड आकारणी करावी अन्यथा रहदारी नियमांच्या जनजागृतीवर भर द्यावा. जनसंपर्क सभांना स्थानिक नगरसेवकांसह स्मार्ट सिटी, महापालिका, पाणीपुरवठा मंडळ आणि हेस्काॅमच्या अधिकार्यांना देखील पाचारण केले जावे आदी सूचना मांडण्यात आल्या. सभेला माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, दुर्गेश मेत्री, बाबू कुट्रे, नूरानी, प्रिया बारिश्वाड, रेणुका अमरापुर, पल्लवी पाटील, सुवर्णा हिरेमठ आदींसह खडेबाजार परीसरातील बहुसंख्य नागरिक, व्यापारी आणि महिला उपस्थित होत्या. अखेर पोलीस उपनिरीक्षक सौदागर यांनी सर्वांचे आभार मानले.