बेळगावसह राज्यातील 7 शहरांमध्ये इंडस्ट्रियल टाऊनशिप सुरू करण्यात येणार असल्याचा सूतोवाच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. चेन्नई -मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर अंतर्गत बेळगाव, चित्रदुर्ग, दावणगेरे व धारवाड येथे इंडस्ट्रियल टाऊनशिप होणार आहे.
बसवराज बोम्मई हे मुख्यमंत्री झाल्यानंतर उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी नव्या योजना राबविण्याची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री बोम्मई यांनी बेळगावच्या टाऊनशिप बाबतचे सूतोवाच केले आहे
. दरम्यान उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांनी बेळगावसह गुलबर्गा, शिमोगा, मंगळूर, बंगळूर, धारवाड व तुमकूर या शहरांमध्येही टाऊनशिप होणार असल्याचे सांगितले आहे. बेळगावात इंडस्ट्रियल टाऊनशिप व्हावी अशी जुनी मागणी आहे. त्या बाबतचे प्रस्तावही अनेकदा तयार करण्यात आले. तथापि शासनाकडून हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत. त्यामुळे गेल्या कांही वर्षापासून या टाऊनशिपची चर्चा थांबली होती. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतचे सूतोवाच केल्याने त्यासंदर्भातील चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
बेळगाव शहरात उद्यमबाग ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. याखेरीज शहराच्या सभोवती देखील औद्योगिक वसाहती आहेत. तथापि शहरात नवीन जागा शोधून तेथे इंडस्ट्रियल टाऊनशिप तयार केली जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शहर व परिसरातील औद्योगिक वसाहतींचाही विकास होणे शक्य आहे. इंडस्ट्रियल टाऊनशिप झाल्यावर उद्याने, समाजभवान, ग्रंथालय, व्यापारी केंद्रं, बँका, पोस्ट कार्यालयं या सुविधा उपलब्ध होतात.
त्यामुळे दर्जेदार रस्ते, नव्या निवासी वसाहती, नागरी सुविधा, नियमित सेवा तातडीने उपलब्ध होऊ शकतात. याखेरीज खुल्या जागा राखीव ठेवल्या जातात. वेअरहाऊस, अग्निशमन सेवा, उद्योग केंद्रं, औद्योगिक प्रदर्शन केंद्रं, पिण्याच्या पाण्याची सुविधा, औद्योगिक कचरा निर्मूलन प्रकल्प, घनकचरा निर्मूलन प्रकल्प, पुरेसा वीज पुरवठा या गोष्टीही त्या ठिकाणी होऊ शकतो.