बेळगावमध्ये हल्ली अनेक अचंबित करणाऱ्या घटना घडत आहेत. अशा घटनांवर हसावं कि रडावं? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडत आहे. असाच एक प्रकार बेळगावमधील सुवर्णसौध येथे घडला.. आणि या घटनेनंतर जिल्हा प्रशासनासह सुवर्णसौध प्रशासन देखील सर्वसामान्य जनतेकडून वेठीला धरले गेले.
याठिकाणी रोजंदारी तत्वावर स्वच्छता कामगार म्हणून काम करणाऱ्या मल्लम्मा नामक महिलेने चक्क सुवर्णसौध समोर शेवया वळत घातल्या.. याचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला.. आणि संपूर्ण दिवस या फोटोवरून जोरदार चर्चाही झाली..!
अनेकांनी हा फोटो पाहून विनोद केले.. अनेकजणांमध्ये हशा पिकला.. दिवसभर सोशल साईटवर टीकाटिप्पण्याही होऊ लागल्या.. परंतु या प्रकरणाला अनेकांनी अत्यंत गांभीर्याने घेत सुवर्णसौधच्या सुरक्षेबाबतच प्रश्न उपस्थित केले. अनेक लोकप्रतिनिधी, विरोधकांनी यावरून प्रशासनाला वेठीला धरत प्रश्नांचा भडीमार केला.
प्रशासनाच्या नाकीनऊ तर आलेच शिवाय मल्लम्माला घडल्या प्रकारावरून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कामावरून कमी केल्याची बातमी देखील बाहेर आली. आणि यानंतर पुन्हा एक नवी सोशल चळवळ उभी राहिली. मल्लम्माला कामावरून कमी करण्यात आल्याविरोधात सोशल साईटच्या माध्यमातून संताप आणि विरोध व्यक्त झाला. आणि यानंतर ‘आय स्टॅन्ड विथ यु मल्लम्मा’ अशी सोशल मोहीमच आखण्यात आली.
‘आय स्टॅन्ड विथ यु’! या सोशल मोहिमेतून मल्लम्माला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी आग्रह करण्यात आला. आणि पाहता पाहता या मोहिमेत अनेक नेटकरी जोडले गेले. अखेर सोशल साईटच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या मोहिमेचा विचार प्रशासनाला करावा लागला आणि पुन्हा मल्लम्माला कामावर रुजू करून घेण्यात आले.
तसा आदेशही जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला. मल्लम्माला घर बांधून देण्याचीही हमी दिली. यासंदर्भात जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन देत मल्लम्माच्या पगारात देखील कोणतीही कपात केली जाणार नसल्याचा दिलासाही मिळाला.
घडलेल्या घटनेनंतर नेटकऱ्यांनी प्रशासनाला अनेक प्रश्नाचा भडीमार केला. एका चुकीमुळे आज प्रशासन एखाद्या कामगारावर कारवाई करू शकते तर आजवर उत्तर कर्नाटकातील सुवर्णसौधसंदर्भात प्रशासनाने निर्णयासंदर्भात केलेल्या दिरंगाईचा जाब कुणाला विचारायचा आणि यासाठी कारवाई कुणावर करायची असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित राहिले.
या साऱ्या घटनेचा तपशील घेत अखेर जिल्हा प्रशासनाने मल्लम्माला पुन्हा कामावर रुजू करून घेतले आणि नेटकऱ्यांनी सुरु केलेली मोहीम यशस्वी ठरली.