कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हिंडलगा येथे तालुका समितीच्या वतीने स्मारक बांधण्यात येत आहे. या स्मारकासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला असून हुतात्मा शंकर खन्नूकर यांच्या मुलाने रोख ११००० रुपयांची देणगी देत हुतात्मा स्मारक उभारणीसाठी हातभार लावला आहे.
गेल्या ६६ वर्षांपासून कर्नाटक प्रशासनाचे अत्याचार झेलत महाराष्ट्रात जाण्यासाठी तळमळणारे मराठी भाषिक आजही आस लावून आहेत. देश ७५ वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला. मात्र ७५ वर्षांच्या स्वतंत्र भारतात गेल्या ६६ वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्कांसाठी मराठी भाषिक झगडत आहे.
कर्नाटकी प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या लाठ्या – काठ्या झेलत आहे. १९८६ साली कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. पोलिसांची दडपशाही आणि अनेक अत्याचार झेलत आजदेखील मराठी भाषिक तितक्याच तळमळीने लढ्यासाठी संघर्ष करत आहे.
कन्नड सक्ती आंदोलनातील हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येत असलेल्या हुतात्मा स्मारकासाठी या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या कै. शंकर खन्नूकर यांच्या मुलाने या स्मारकासाठी ११००० रोख रुपयांची मदत देऊ केली आहे.
आज हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या सर्व मराठी भाषिकांच्या उपस्थितीत हि देणगी सुपूर्द करण्यात आली आहे. यावेळी नितीन खन्नूकर, संतोष शिवनगेकर राहुल भोसले, शांताराम होसूरकर, महेश जुवेकर आणि इतर मराठी भाषिक मान्यवर उपस्थित होते.