मराठी कागदपत्रांची मागणी करून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोरखेळ करत आहे. ही अर्थहीन मागणी कधीही मान्य होणार नाही. कन्नड भाषाच आमची अधिकृत आहे. त्यामुळे समाजात दुही पसरवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे, त्यांच्यावर कारवाई करू, अशी दर्पोक्ती जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मारली.
बेळगावात सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढून सरकारी परिपत्रिक मराठी भाषेत द्यावी अशी मागणी केली त्या पाश्वभूमीवर गोविंद कारजोळ यांनी समिती बाबत वादग्रस्त विधान केले आहे.
म. ए. समितीचे लोक काही पाकिस्तानातून येथे येऊन दंगा करत नाहीत. तेही आमचे बंधू आहेत, मात्र त्यांच्यातील काही लोक पोरखेळ करत आहेत. त्यांना आम्ही बरोबर धडा शिकवू असेही यावेळी ते म्हणाले.
मराठी आणि कन्नड भाषिक भावा-भावाप्रमाणे राहिले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. कर्नाटकात कन्नड हीच प्रशासकीय भाषा असल्याने त्यांनी सहकार्य केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मराठी कागदपत्रांची अर्थहीन मागणी करून म. ए. समितीने समाजात अशांतता माजवण्याचा प्रयत्न करू नये असा फुकटचा सल्लाही त्यांनी दिला. कन्नड भाषेत आमचे प्रशासन असल्याने कन्नडमध्येच आम्ही पत्रव्यवहार करतो.
प्रसंगी सुप्रीम कोर्ट किंवा परराज्यांशी संपर्क करताना इंग्रजीचा वापर करतो. त्यामुळे समितीची मागणी अर्थहीन आहे, ती पूर्ण करण्याची गरज नाही. मराठी लोक आमच्यासोबत कन्नड प्रदेशात राहात आहेत. दुराभिमान सोडून त्यांनी प्रशासन आणि सरकारला सहकार्य करावे, असे कारजोळ म्हणाले.