गौंडवाड (ता. जि. बेळगाव) गावातील देवस्थान जमिनीच्या वादातून गेल्या शनिवारी रात्री एकाचा खून होण्याबरोबरच गावात दंगल उफाळून जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी खून प्रकरणी 7 जण, तर जाळपोळ प्रकरणी 19 जण अशा एकूण 26 जणांना गजाआड केले आहे. पोलिसांची धरपकड अद्यापही सुरू असून सध्या तणावाच्या वातावरणासह गौंडवाड गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
गौंडवाड गावातील देवस्थान जमिनीचा वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. या वादातून यापूर्वी देखील हाणामारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा जुना वाद 2 वर्षांपूर्वी उफाळून आला होता. गावातील काही कुटुंब विरुद्ध ग्रामस्थ असा हा वाद आहे. यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या मध्यस्थीमुळे गेली दोन वर्षे हा वाद शमला होता. हा वाद शनिवारी पुन्हा उफाळून आला जेंव्हा त्यादिवशी रात्री 9:30 च्या सुमारास देवस्थान जमिनीसाठी ग्रामस्थांच्यावतीने लढा देणाऱ्या सतीश राजेंद्र पाटील (वय 37) या तरुणावर चाकू व जंबियाने हल्ला करून खून करण्यात आला. खुनी हल्ला झाल्यानंतर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असणाऱ्या सतीश पाटील यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती गावात पसरताच संतप्त जमावाने दगडफेक करण्याबरोबरच जाळपोळ करण्यास सुरुवात केली. जमावाने इनोव्हा कार, टाटा सुमो, ट्रॅक्टर अशी सुमारे 6 हून अधिक वाहने आणि गवत गंज्या पेटवून दिल्या. परिणामी आज रविवारी देखील संपूर्ण गावात दहशतीचे व भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ, पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. सध्या परिस्थिती आणखी आणखी बिघडू नये यासाठी गावात सर्वत्र पोलीस आणि पोलीस वाहने तैनात करण्यात आली असल्यामुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
गौंडवाड गावालगतच्या कंग्राळी बुद्रुक गावात संतप्त जमावाने बेदम मारहाण करून नुकताच एकाचा खून केला होता. त्यानंतर दोन दिवसातच गौंडवाड गावात खुनाची घटना व दंगल उसळण्याचा प्रकार घडल्याने या परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. गौंडवाड येथील घटनेची प्रतिक्रिया आणखी तीव्र उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.