ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली हयात घालवली आणि हजारो विद्यार्थ्यांना घडविले त्या प्रभाताई देशपांडे यांनी सुरू केलेल्या शाळेचा आता वटवृक्ष झाला असून त्यांच्या स्मरणार्थ महिला विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेचे नामकरण ‘प्रभाताई देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल’असे करण्याचा निर्णय महिला विद्यालय शाळा समितिने घेतला आहे.
प्रभादेवी देशपांडे यांचा जन्म 18 जून 1931 रोजी झाला. सामाजिक कार्याची आवड असलेल्या प्रभाताई यांनी 1971 साली ‘स्कूल ऑफ कल्चर’ नावाची शाळा सुरू केली. त्यासाठी त्यांनी घरोघरी फिरून विद्यार्थी जमा केले. त्यांच्या कठोर परिश्रम आणि जिद्दीतून हजारो विद्यार्थी घडले. तेव्हापासूनच त्यांची शाळा ही प्रभाताई ची शाळा म्हणून ओळखली जाते .
त्यानंतर महिला विद्यालय मंडळाच्या संचालक मंडळाशी चर्चा करून त्यांनी आपली शाळा महिला विद्यालयात समाविष्ट केली. एकही पैसा मानधन न घेता त्यांनी कठोर परिश्रमातून आणि त्यागातून शाळा नावरूपासआणली. त्यामुळेच त्यांनी घडविलेले हजारो विद्यार्थी आज जगभरात वेगवेगळया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.
प्रभाताईंनी सुरू केलेल्या या शाळेत आज दोन हजार विद्यार्थी असून गेल्या वर्षीच्या दहावी परीक्षेत पारुल हुन्नरगीकर हिने 625 पैकी 624 गुण मिळवले असून शाळेत प्रथम आली आहे
18 जून हा प्रभाताईंचा वाढदिवस, त्याचे औचित्य साधून महिला विद्यालय शाळेचे नामकरण महिला विद्यालय मंडळाचे प्रभाताई देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल असे करण्याचा निर्णय घेतला आहे.
रामकृष्ण मिशन कोल्हापूर चे अध्यक्ष स्वामी बुद्धा नंद जी हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम रावसाहेब गोगटे रंगमंदिर येथे शनिवारी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी एडवोकेट विवेक कुलकर्णी- एक्सम्बेकर यांनी दिली.