आपण एका जागतिक वारसा स्थळाच्या ठिकाणी राहत आहोत याची जाणीव ठेवा आणि निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण करा. आपल्या परिसरातील जैवविविधतेच्या अभ्यासात रस घ्या, असे आवाहन पर्यावरणप्रेमी वनौषधी तज्ञ डॉ. श्रीनिवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
खानापूर तालुक्यातील जांबोटी हायस्कूल येथे 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देताना बेळगावचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर श्रीनिवास पाटील बोलत होते.
‘पर्यावरण’ या विषयावर बोलताना डॉ पाटील म्हणाले की, आपण पश्चिम घाटामध्ये मोडतो आणि जांबोटी हा भाग जैवविविधतेने समृद्ध आहे. जगातील जैवविविधतेचे जे प्रमुख आठ हॉटस्पॉट आहेत, त्यामध्ये पश्चिम घाटाचा समावेश आहे. सावंतवाडीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या पश्चिम घाटातील प्रामुख्याने अणशी, दांडेली, जांबोटी हा भाग जैवविविधतेच्या बाबतीत अधिक घनदाट आहे.
अशा या भागात आपण सर्वजण राहता ही मोठी भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपण एका जागतिक वारसा स्थळाच्या ठिकाणी राहत आहोत याची जाणीव ठेवा आणि निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण करा. आपल्या परिसरातील जैवविविधतेच्या अभ्यासात रस घ्या असे सांगून उपस्थित विद्यार्थ्यांपैकी एकाने जरी त्याबाबतीत पुढाकार घेतला तरी माझ्या या भाषणाचे सार्थक झाले असे मी समजेन, अशी अपेक्षा शेवटी डॉ. श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.
जांबोटी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक सडेकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झालेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमास डॉ. श्रीनिवास पाटील यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून खानापुरातील लोकनेत्या धनश्री सरदेसाई, उपवनसंरक्षक आधिकारी नागराज निरवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण आणि आयुर्वेदिक उपचाराच्या बाबतीतील योगदानाबद्दल यावेळी डॉ. श्रीनिवास पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे डेप्युटी पीडिओ, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.