कर्नाटक -महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये सहाय्य करणाऱ्या तज्ञ समितीची बैठक जवळपास दीड वर्षानंतर उद्या बुधवार दि 8 जून रोजी मुंबई येथे होणार असून या बैठकीमुळे खटल्याला नव्याने चालना मिळणार आहे.
कोरोना नंतर तब्बल दीड वर्षा नंतर मुंबईत सीमा प्रश्नी ही महत्त्वाची बैठक बुधवारी होत आहे.मुंबईत उद्या होणाऱ्या तज्ञ समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव liveने मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्याशी संपर्क साधला असता बैठकी बाबतीत माहिती दिली आहे.
मरगाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक -महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये सहाय्य करणाऱ्या तज्ञ समितीसह उच्चाधिकार समितीची बैठक याआधी गेल्या 27 डिसेंबर 2020 रोजी झाली होती त्यानंतर मधल्या जवळपास दीड-दोन वर्षाच्या कालावधीत या समितीची बैठक झाली नव्हती. आता महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच या समितीची बैठक मुंबई येथे मंत्रालयात होणार आहे.
महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर मंत्री जयंत पाटील यांची तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्ष या नात्याने जयंत पाटील यांची देखील ही पहिलीच बैठक असणार आहे. या बैठकीत ते सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजाची माहिती व प्रगती जाणून घेणार आहेत.
सदर बैठकीस तज्ञ समितीचे सदस्य बेळगाव येथील ॲड. राम आपटे, राजाभाऊ पाटील व महाराष्ट्राचे माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर हे सदस्य सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाचे अधिकारी महाधिवक्ता व वकील बैठकीला उपस्थित असणार आहेत.
या बैठकीत बैठकीत पूर्वी राहून गेलेली कामे, नव्याने वकिलांच्या नेमणुका आदी आवश्यक सर्व बाबींवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. एकंदर या बैठकीत सीमाप्रश्नी खटल्यातील रखडलेल्या कामांना पर्यायाने खटल्याला नव्याने चालना दिली जाणार आहे, असा विश्वास मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.