गोवावेस येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलाची इमारत धोकादायक बनल्याने तेथील ईएसआय क्लिनिक आता खाऊ कट्टा समोरील आदिशक्ती इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पुढील कांही वर्षे याच इमारतीत हे क्लिनिक सुरू राहणार असून ईएसआय संबंधित कामगारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव शहरात अशोकनगर येथे ईएसआयचे मुख्य हॉस्पिटल असून त्या अंतर्गत शहर व परिसरात पाच ईएसआय क्लिनिक कार्यरत आहेत. त्यामध्ये गोवावेस, उद्यमबाग, चन्नम्मानगर, पिरनवाडी व यमुनापूर येथील क्लिनिकचा समावेश आहे.
गोवावेस येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलाची इमारत धोकादायक बनत चालल्याने त्याठिकाणी असलेल्या व्यापारी आस्थापणांसह सर्वांनीच आपली जागा रिकामी करावी, असे महापालिकेने नोटिशीद्वारे कळविले होते.
त्यानुसार तेथील ईएसआय क्लीनिकही हटविण्यात आले असून ते खाऊ कट्टा समोरील आदीशक्ती इमारतीमध्ये गेल्या आठ दिवसापासून सुरू झाले आहे. या क्लिनिकमधून रोज अनेक कामगार उपचार घेतात.
या ईएसआय क्लिनिकमध्ये सध्या एक मेडिकल ऑफिसर, दोन नर्स, फार्मासिस्ट, दोन ग्रुप -डी कर्मचारी व एक क्लार्क असे कर्मचारी आहेत.
क्लिनिक स्थलांतरासंबंधी ईएसआयने बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्ससहित सर्व महत्त्वाच्या कंपन्यांना पत्रं पाठविली आहेत. क्लिनिकच्या या स्थलांतराची संबंधित कामगारांनी देखील नोंद घेऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.