बेळगाव शहरात अलिकडे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धोकादायक बनत चाललेल्या या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या माकडावर सामाजिक कार्यकर्त्यांनी शहापूर स्मशानानजीक अंतिम विधी केला.
आदर्शनगर वडगाव येथील मेघदूत कॉलनी उद्यानाजवळ भटक्या कुत्र्यांनी एका माकडावर जोरदार हल्ला करून त्याला ठार मारले. या भागातील काही नागरिकांनी ही घटना महापालिका सफाई कामगारांना कळवून मेलेल्या माकडाला कचरा गाडीतून नेण्याची विनंती केली.
ही बाब कचरा गाडीवर असणाऱ्या राजेश गोल्लर यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि स्वच्छता प्रभाग निरीक्षक संजय पाटील यांना कळवली. संजय पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना जिल्हा संघटक रवींद्र जाधव तसेच मायक्रो औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी रमेश देसुरकर आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन पाटील यांना याबद्दल माहिती दिली.
या सर्वांनी सदर मृत माकडाला शहापूर स्मशानभूमी नजीकच्या गायरान आवारात आणून तेथे त्याच्यावर अंतिम संस्कार केले.
संजय पाटील, रमेश देसुरकर आणि रवींद्र जाधव यांनी यावेळी त्या मृत माकडाला आदरांजली वाहिली. तसेच महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली.
माकडावरील अंतिम संस्कारासाठी संजय पाटील, रमेश देसुरकर, रवींद्र जाधव यांना राजेश गोल्लर, सफाई कामगार सुरज कांबळे, रमेश कोलकार, उळवाप्पा कोलकार, फकिराप्पा भोमन्नावर व राकेश कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. नेहमीच सेवाभावी कार्यात अग्रेसर असणारे संजय पाटील हे लोकांच्या अडीअडचणीला धावून जातात. ते एक आघाडीचे रक्तदाते आहेत. त्यांच्या उपरोक्त कार्याची प्रशंसा होत आहे.