बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा (एपीएमसी) विकास करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून त्यासाठी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये शिल्लक असलेले गाळे गोव्यात भाजी पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना दिले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहे.
एपीएमसी भाजी मार्केट मधील व्यापारी आणि जिल्हाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक काल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत बोलताना जिल्हाधिकार्यांनी उपरोक्त आश्वासन दिले. जयकिसान भाजी मार्केट तात्काळ बंद करावे आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एपीएमसी आवारात भेट देऊन भाजी मार्केटची दुर्दशा पहावी या मागणीसाठी गेल्या 17 जून रोजी एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापार्यांनी आंदोलन छेडले होते. त्याची दखल घेऊन चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काल व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती.
एपीएमसी भाजी मार्केटमध्ये कांही गाळे शिल्लक आहेत. या ठिकाणी गोव्याला भाजी पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना भाजी विक्रीची संधी दिली जाईल. शहरात रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांनाही एपीएमसीमध्ये भाजी विक्रीची संधी दिली जाईल. फळ मार्केट, शेंगा मार्केट व अन्य छोट्या मार्केटचे एपीएमसीमध्ये स्थलांतर केले जाईल. शेतकऱ्यांसाठी व ग्राहकांसाठी बेळगाव शहर बस स्थानक ते एपीएमसी दरम्यान बसची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल, अशी आश्वासने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बैठकीत दिली.
बैठकीस एपीएमसी सचिव गुरुप्रसाद, बसनगौडा पाटील, सतीश पाटील, सदा पाटील, महेश पाटील, एम. वाय. पाटील, सतीश कोदानपुरी, विनोद राजगोळकर, मनोहर होसुरकर, गुंडू पाटील, मारुती कुट्रे आदी उपस्थित होते.