रस्त्यांच्या पदपथ अर्थात फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याबरोबरच शहर सौंदर्यीकरणाला प्राधान्य दिले जावे. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासंदर्भातील तक्रारींचे 24 तासात निवारण केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि बेळगाव महापालिकेचे प्रशासक नितेश पाटील यांनी आज केल्या.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज गुरुवारी सकाळी महापालिका कार्यालयाला भेट देऊन तेथील विविध विभागाच्या कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर आयोजित अधिकाऱ्यांच्या सभेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त सूचना केल्या. शहरातील कांही प्रमुख मार्ग वगळता उर्वरित बहुतांश मार्ग अर्थात रस्त्यांवरील फुटपाथवर अतिक्रमणे झाल्याचे दिसून येते. यामुळे पादचार्यांना अडथळा निर्माण होऊन त्रास होतो. याखेरीज वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. तेंव्हा सर्वप्रथम शहरातील रस्त्यांच्या फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी बैठकीत सांगितले. शहरातील पिण्याच्या पाणी पुरवठा संदर्भात कोणतीही तक्रार आली तर त्या तक्रारीचे त्वरेने 24 तासात निवारण केले जावे. या बाबतीत कोणत्याही कारणास्तव विलंब केला जाऊ नये असे सांगून शहर सौंदर्यीकरणाला प्राधान्य दिले जावे असे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्याला सुरुवात होत आहे, तेंव्हा त्यासंबंधीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जावीत. शहरातील प्रमुख रस्ते आणि लोकवस्तीच्या आसपास असणाऱ्यांना नाल्यांची प्रामुख्याने पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात यावी. बेळगाव महानगर पालिका व्याप्तीतील मालमत्ता संदर्भातील डिजिटल दाखले उपलब्ध करून देणारी ‘ई -अस्ती’ प्रणालीद्वारे नागरिकांच्या दृष्टीने अनुकूल असे कार्य केले जावे. शहरातील महापालिकेच्या मालमत्ता सुरक्षित राहतील यासाठी आवश्यक क्रम घेण्यात यावेत, या सुचनेसह अन्य कांही महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकारी व प्रशासक नितेश पाटील यांनी बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी यावेळी बोलताना नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शहर स्वच्छता तसेच अन्य सेवा उत्तम प्रकारे मिळाव्यात यासाठी पालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. महापालिकेतील कामकाजाची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेण्यापूर्वी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महापालिका कार्यालय आवारात असलेल्या उद्यानाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला चालना दिली. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. घाळी आणि उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिका कार्यालयाला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध सोयी-सुविधांचा लाभ मिळणे सोयीचे जावे यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विश्वेश्वरय्यानगर येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील प्रत्येक कामाची माहिती जाणून घेतली. तसेच रहदारी यंत्रणा, बससंचार व्यवस्था आदीं संदर्भात घेतल्या जाणाऱ्या खबरदारी संबंधी त्यांनी तेथील अधिकार्यांशी चर्चा केली.