बेळगावच्या नव्या जेएनएफसी न्यायालय इमारतीच्या आवार भिंतीचे प्रवेशद्वार (मेन गेट) पूर्वीइतकेच न ठेवता आणखी 15 फूट रुंद मोठे करावे, अशी मागणी वकील वर्गातून केली जात आहे.
बेळगावच्या नव्या जेएनएफसी न्यायालय इमारत आवाराची जुनी संरक्षक भिंत पाडून तिचे नव्याने बांधकाम केले जात आहे, पर्यायाने प्रवेशद्वार देखील नव्याने बांधले जाणार आहे. सदर मुख्य प्रवेशद्वार पूर्वीच्याच आकाराचे असू नये असे वकील मंडळींचे मत आहे.
कारण पूर्वीचे जे प्रवेशद्वार होते त्यामधून ये-जा करताना चार चाकी वाहनांना अडचण येत होती. एकाचवेळी या प्रवेशद्वारातून दोन कारगाड्या ये -जा करू शकत नव्हत्या.
त्यामुळे समोरून येणारी कारगाडी प्रवेशद्वारातून बाहेर पडेपर्यंत दुसऱ्या वाहनचालकास तिष्ठत थांबावे लागत होते. त्यामुळे बऱ्याचदा चारचाकी वाहनधारक वकील मंडळींना न्यायालयात वेळेत पोहोचणे कठीण जात होते.
यासाठी आता नव्याने प्रवेशद्वार बांधताना ते आकाराने पूर्वीइतकेच न ठेवता थोडे प्रशस्त करावे. पूर्वीच्या प्रवेशद्वारापेक्षा आणखी 15 फूट जास्त रुंदी वाढविल्यास चारचाकी वाहनांना न्यायालय आवारात ये-जा करणे सुरक्षित व सुलभ जाणार आहे. तेंव्हा याची दखल घेऊन प्रवेशद्वाराची रुंदी 15 फुटाने वाढवावी, अशी मागणी वकीलवर्गाकडून केली जात आहे.