बेळगाव ते गोवा दरम्यानचा चोर्ला महामार्ग आता केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनाकडून चोर्ला मार्ग रुंदीकरणाची घोषणा करण्यात आली आहे.
हुबळी येथील केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनाने गोवा सरकारला एका पत्राद्वारे महामार्ग हस्तांतराची कल्पना दिली असून चोर्ला महामार्ग लवकरच हस्तांतरित केला जाणार आहे. तसेच या महामार्गाच्या रुंदीकरणाची घोषणाही केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनाने केली आहे.
सदर महामार्गाचे बेळगावनजीकच्या पिरनवाडीपर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. पिरनवाडी ते गोवा पर्यंतच्या महामार्ग रुंदीकरणासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले जाणार असून रुंदीकरणाला लवकरच प्रारंभ होणार आहे. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अलीकडेच सदर रस्ता रुंदीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला होता.
पिरनवाडी ते गोव्या दरम्यानच्या चोर्ला महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. सध्या सदर रस्ता जांबोटीपर्यंत प्रशस्त रुंद असला तरी पुढे अरुंद असल्यामुळे त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. विशेष करून चोर्ला घाटातील गोव्याच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
तथापि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय महामार्ग व्यवस्थापन कर्नाटक आणि गोवा अशा दोन्ही बाजूने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेणार आहे. त्याचप्रमाणे रस्ता रुंदीकरणाला सुरुवात होताच गोवा हद्दीतील केरी, परे, मोरले आणि साखळी येथील रस्त्याशेजारील बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पिरनवाडी येथील अतिक्रमणांचा मुद्दा ही गंभीर असून रस्ता रुंदीकरणाप्रसंगी संबंधित अतिक्रमणे हटवण्यात येण्याची शक्यता आहे.