बेंगळूर महानगर परिवहन मंडळाने (बीएमटीसी) भंगारात काढलेल्या बसेस अखेर वायव्य परिवहन महामंडळाने खरेदी केले असून त्यापैकी सुमारे 20 बसेस बेळगाव विभागाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बीएमटीसीने 8 ते 9 लाख किलोमीटर धावलेल्या आपल्या ताफ्यातील 25 हजार बसेस भंगारात काढल्या आहेत. या बसेस 50 हजार ते 1 लाख रुपयांना खरेदी करून दुरुस्ती नंतर पुन्हा वापरण्याचा निर्णय वायव्य परिवहन महामंडळाने गेल्या महिन्यात घेतला होता.
या बसेस हुबळी-धारवाड आणि बेळगाव विभागाला पुरविल्या जाणार आहेत. बेळगाव विभागाच्या ताब्यात दाखल होणाऱ्या 20 बसेस सुमारे 10 वर्षे वापरल्या गेल्या आहेत. या वापरलेल्या बसेस आता बळगाव शहर आणि उपनगर मार्गावर धावणार आहेत.
गत दोन वर्षात कोरोना संसर्गामुळे वायव्य परिवहन महामंडळ आर्थिक तोट्यात सापडले आहे. उत्पन्ना अभावी नव्या बसेसची खरेदी ठप्प झाल्यामुळे बीएमटीसीने भंगारात काढलेल्या बसेसची खरेदी करण्यात आली आहे.
दरम्यान, परिवहन मंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेचा कोणताही विचार न करता हा निर्णय घेतला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 8 ते 9 लाख कि. मी. धावलेल्या बसेस वापरण्यास योग्य नसल्याने बीएमटीसीने त्या भंगारात काढल्या आहेत.
अशा बसेस खरेदी करून प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार वायव्य परिवहन महामंडळ करत असल्याचा आरोप होत आहे.