स्वेच्छा स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आता लवकरच को -विन पोर्टलवर आपल्या नावाची नोंदणी करता येणार असून त्याद्वारे त्यांची मदत गरजू रुग्ण, त्यांच्या भागातील रक्तपेढ्या, आयोजित रक्तदान शिबिर आदिंना मिळू शकणार आहे.
स्वयंस्फूर्तीने स्वतःहून रक्तदान करून इतरांचे जीव वाचवणाऱ्या रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक रक्तदाता दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नुकतीच आभासी बैठक घेतली. यंदा येत्या 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जाणार आहे. ‘एकात्मतेची कृती म्हणून रक्तदान करा आणि मनुष्याचा जीव वाचवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना सहकार्य करा’ या घोषवाक्य खाली यंदाचा हा जागतिक रक्तदाता दिन भारतात साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ऐच्छीक रक्तदानासंदर्भात जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे त्या संदर्भातील आवश्यक तयारी करण्याची सूचनाही केली आहे.
याखेरीज स्वेच्छा स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना को -विन पोर्टलवर नांव नांव नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही नांव नोंदणी आरोग्य सेतूची लिंक असलेल्या ई -रक्तकोष या ठिकाणी करता येईल. रक्तदानाचे प्रमाणपत्र संबंधित रक्तपेढीकडून ई -रक्तकोष लिंकवर तयार केले जाईल आणि ते आरोग्य सेतू ॲपवर उपलब्ध असेल.