गेल्या आठ वर्षांत भाजप सरकाने देशाचा विकास साधला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गंगा वहात आहे. याच धर्तीवर शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी केले. दोन्ही उमेदवार प्रथम प्राधान्याच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आ. पाटील यांनी सोमवारी ऐनापूर, उगार खुर्द, उगार बुद्रूक, शिरगुप्पीसह शाळा व शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. पदवीधर विभागाचे उमेदवार हणमंत निराणी व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अरुण शहापूर यांचा झंझावाती प्रचार आ. पाटील यांनी सुरू केला आहे.
शैक्षणिक केंद्रांना भेटी देऊन आ. पाटील यांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना प्रथम प्राधान्याचे मत देण्याची विनंती केली. यावेळी ते म्हणाले, जातीपातीचे राजकारण न करता भाजपने फक्त विकासाला प्राधान्य दिले आहे. केंद्रात भाजप सरकारने गेल्या आठ वर्षात साधलेला विकास उठून दिसत आहे. शिवाय राज्यातही बोम्मई सरकारची विकासाची घोडदौड सुरू आहे.
हणमंत निराणी यांनी एकदा, तर अरूण शहापूर यांनी दोनदा शिक्षकांचे नेतृत्व केले आहे. त्यांना शिक्षक व पदवीधरांच्या समस्यांची उत्तम जाण आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्व समस्या त्यांच्याकडून तातडीने निकालात काढल्या जातील. भविष्यात शिक्षकांच्या तसेच बेरोजगार तरुणांच्या रोजगाराची समस्या मार्गी लावायच्या असतील, तर भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विधानपरिषदेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केली.
कागवाड मतदार संघ पिंजून काढत त्यांनी झंझावाती प्रचार सुरू केला आहे. 13 जून रोजी मतदान होणार असून तत्पूर्वी सर्व शाळा, शैक्षणिक संस्था तसेच पदवीधर मतदार असलेल्या ठिकाणी त्यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. त्यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व तरुणांची उपस्थिती दिसत आहे.