1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात 6 जून रोजी पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित कार्यक्रम आज सोमवारी बेळगुंदी येथे गांभीर्याने पार पडला.
1986 मध्ये झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलन याप्रसंगी पोलिसांच्या गोळीबारात 6 जून रोजी बेळगुंदी येथे तिघा तरुणांनी हौतात्म्य पत्करले. सालाबादप्रमाणे या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम बेळगुंदीवासीय आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्तीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, आदींनी बेळगुंदी येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना नमन केले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना दीपक दळवी यांनी 1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनाची थोडक्यात माहिती देताना त्याकाळी 1 ते 6 जून या दरम्यान सदर आंदोलन पेटले. त्यावेळी लोकांना शांत करण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी फिरत होतो परंतु आम्हाला अटक करून धारवाडला धाडण्यात आले. त्यावेळी कोरेगाव तालुक्याचा पश्चिमेचा भाग पोलिसांना बंद झाला होता. त्यांनी आमच्याकडे गयावया केली की तुम्ही या भागात जनतेला शांत करण्यासाठी जाऊ शकता का? त्यावेळी पोलिसांच्या मनात दहशत बसली होती की बेळगुंदीचे लोक राकसकोप धरण फोडतील.1 जूनला सुरू झालेले आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांना 6 जून रोजी गोळीबार करावा लागला. यावरून एक दिसून आला की तो काळ सत्वपरीक्षेचा होता आणि मराठी भाषिकांनी निर्धार केला होता की मागे हटायचे नाही. मराठी भाषिक शांत होणार नाहीत, मागे हटणार नाहीत आणि कदाचित राकसकोप सारखे मोठे धरण ते फोडण्यासाठी संतप्त बेळगुंदीवासीय हातात फावडी, कुदळ, पहारी घेऊन राकसकोप धरणाकडे निघाले आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचत होती, परंतु आम्हाला त्याआधीच अटक झाली होती. यावरून महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद सर्वांनी ओळखली पाहिजे, असे दळवी यांनी सांगितले.
माजी आमदार मनोहर किणेकर यांनी 6 जून 1986 साली बेळगुंदी भागात पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात मारुती गावडा, भावकु चव्हाण व कल्लाप्पा उचगावकर या तीन तरुणांनी हौतात्म्य पत्करल्याचे सांगितले. 1956 रोजी राज्य पुनर्रचनेप्रसंगी बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. हा भाग जोपर्यंत महाराष्ट्रात सामील होत नाही तोपर्यंत कर्नाटकची राज्यभाषा कन्नडची सक्ती सीमाभागात करू नये यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली तेंव्हापासून लढा दिला जात आहे असे सांगून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार कडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती देऊन सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल असला तरी महाराष्ट्रात सामील होण्याची आपली प्रखर इच्छा दाखवून देण्यासाठी आपण सर्व मराठी भाषिकांनी रस्त्यावरचा लढा सुरू ठेवला पाहिजे, असे किणेकर यांनी सांगितले.
बेळगुंदी येथील हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास मध्यवर्ती म ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, आर. आय. पाटील, आदींसह समितीचे अन्य पदाधिकारी आणि बेळगुंदीवासिय बहुसंख्येने उपस्थित होते.