मी आणि माझ्यासारखे कट्टर शिवसैनिक शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंद करून शिवसेनेत फूट पाडली असली तरी माझ्यासह बेळगावातील कट्टर शिवसैनिक आम्ही सर्वजण ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी आहोत, अशी ठाम प्रतिक्रिया दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेल्या कट्टर शिवसैनिकांपैकी एक असणारे बेळगाव शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुर यांनी दिली.
गेल्या चार -पाच दिवसापासून शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडाळीमुळे महाराष्ट्र जो सत्तासंघर्ष सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर बेळगाव Liveने संपर्क साधला असता 70 वर्षीय नागनुरी बोलत होते. ते म्हणाले की, मुंबई येथील कांजुर मार्ग शिवसेना शाखा क्र. 120 चा मी शिवसैनिक आहे. 1976 पासून मी शिवसैनिक म्हणून कार्यरत असून त्याकाळी मुंबईत क्रॉम्प्टन अँड ग्रीव्हज कंपनीमध्ये कामाला होतो. वयाच्या 20 व्या वर्षी शिवसेनेत दाखल झालो.
मी माननीय दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि मा. उद्धवजी ठाकरे यांना मानणारा ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असा कट्टर शिवसैनिक आहे. मा. बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू असे जे 5000 कट्टर शिवसैनिक होते त्यापैकी मी एक आहे. राम जन्मभूमी वादाप्रसंगी लखनौ न्यायालयाने बाळासाहेबांना नोटीस बजावली. त्यावेळी साहेबांसाठी जीव देण्यास तयार झालेल्या या 5000 कट्टर शिवसैनिकांमध्ये जीव देण्यासाठी माझा क्रमांक 674 वा होता. थोडक्यात मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना मानणारा एकनिष्ठ शिवसैनिक आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या आंदोलनाप्रसंगी छगन भुजबळ हे ज्यावेळी बेळगावमध्ये विषयांतर करून आंदोलनासाठी आले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत जाण्यासाठी आम्हीही नावे दिली होती. मात्र अपरिचित शिवसैनिकांना बेळगावातील आंदोलनात भाग घेण्यासाठी पाठवावे असा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश होता. परिणामी मी बेळगावचा असल्याकारणाने मला त्यावेळी पाठविण्यात आले नाही, अशी माहिती अरविंद नागनुरी यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत फूट पाडली असली तरी माझ्यासह बेळगाव सीमा भागातील शिवसैनिक संपुर्णपणे ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. येथील शिवसेनेचे कार्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आमदार सुनील राऊत व नगरसेवक बाबा कदम यांच्या आदेशानुसार पूर्वीसारखेच सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव सीमाभागाचे शिवसेना सह संपर्कप्रमुख असणारे अरविंद नागनुरी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले कट्टर शिवसैनिक म्हणून सुपरिचित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या अयोध्या दौऱ्यात त्यांचा समावेश होता.गेल्या 50 वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असलेल्या नागनुरी यांची मुंबईच्या सेना भवनामध्ये कायम ये-जा असते.