वायव्य पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुनील संक यांच्या बद्दल विधान करणारे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी त्यांचे एजंट आहेत का? असा सवाल केपीसीसी उपाध्यक्ष आयवन डिसोजा यांनी केला.
बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात मतदारांनी काँग्रेसला विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
मागील वेळी भाजप उमेदवाराला निवडून दिले, मात्र आमच्या समस्या त्यांनी अद्यापपर्यंत सोडविलेल्या नाही तसा संताप मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता काँग्रेसचा विजय निश्चित आहे असे डिसोजा पुढे म्हणाले.
मी स्वतः शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदारांना भेटलो आहे. केंद्र आणि राज्य सरकारने युवकांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून झुलवत ठेवले आहे. राज्यात शिक्षकांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही आहे.
शिक्षकांनी पेन्शनला विरोध केला आहे असे सांगून त्यांची एनपीएस लागू करण्याची मागणी पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही डिसोजा यांनी केला पत्रकार परिषदेत प्रसंगी काँग्रेसचे बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, प्रदीप एम. जे., सरला सातपुते, बसवराज शिग्गीहळ्ळी आदी स्थानिक नेते उपस्थित होते.