बेळगाव येथेच कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून गेल्या सोमवारपासून छेडलेले आंदोलन आज शुक्रवारी चौथ्या दिवशीही सुरूच होते. सरकारचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आता वकिलांनी आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ बेळगावला स्थापन व्हावे अशी मागणी असून ग्राहक न्यायालय आयोगाच्या अध्यक्षांनीही तशी शिफारस केली आहे. मात्र बेळगाव ऐवजी राज्य शासनाकडून कलबुर्गी येथे खंडपीठ उभारण्याची तयारी सुरू आहे.
याला आक्षेप घेत बेळगाव बार असोसिएशनने गेल्या सोमवारी मोर्चाने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्याबरोबरच न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालून आंदोलन छेडले आहे. मोर्चा काढण्याबरोबरच वकिलांकडून चन्नम्मा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलनही छेडण्यात आले होते. समस्त वकीलवर्गाने ‘न्यायालयीन कामकाज बंद’ आंदोलन आज शुक्रवारी चौथ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे.
बेळगाव येथेच कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ व्हावे या आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालणाऱ्या बेळगाव बार असोसिएशनने आता आज शुक्रवारपासून साखळी उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. यावेळी आमदार द्वयीनी आणि काँग्रेस नेत्यांनी देखील आंदोलन स्थळी भेट देऊन वकिलांशी चर्चा करत बेळगाव मधल्या वकिलांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
वकिलांच्या साखळी उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये शामियाना आणि व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी वकिलांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आजच्या साखळी उपोषणात बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी, उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. बसवराज सुलतानपुरी, ॲड. एस. वाय. गणमुखी, ॲड. आर. सी. पाटील, ॲड. अरुण मरेण्णावर, ॲड. अरीफ नदाफ, ॲड. अजय मडीयाळी, ॲड. प्रकाश पाटील आणि ॲड. किरण पुजेरी यांचा सहभाग आहे.
उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी याप्रसंगी ॲड. सचिन शिवन्नावर, ॲड. गिरीराज पाटील संयुक्त सचिव ॲड. बंटी कपाही, ॲड. महांतेश पाटील, ॲड. अभिषेक उदोशी, ॲड. आदर्श पाटील, ॲड. इरफान ब्याल, ॲड. प्रभाकर पवार, ॲड. पुजा पाटील, ॲड. मारुती कामाण्णाचे आदी बहुसंख्य वकील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उपस्थित आहेत.