बसवन कुडची येथील लक्ष्मी गल्लीतील रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित पूर्ण न करता अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून चिखलाने भरलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
गेल्या चार वर्षांपासून स्मार्ट सिटी योजना बेळगाव अंमलात आणली जात असताना शहर कार्यक्षेत्रात येणाऱ्या बसवन कुडची येथील लक्ष्मी गल्ली येथील रस्त्याकडे मात्र गेल्या दोन वर्षापासून साफ दुर्लक्ष झाले आहे. बसवन कुडची येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर असलेल्या लक्ष्मी गल्लीतील रस्त्याचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून अर्धवट अवस्थेत पडून आहे.
दोन वर्षांपूर्वी सुरुवातीच्या अवघ्या चार घरापर्यंत या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले. मात्र त्यानंतर हे काम जे ठप्प झाले ते आजतागायत पूर्ण करण्यात आलेले नाही. परिणामी सदर रस्त्यावर विशेष करून पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे प्रचंड साम्राज्य पसरते. त्यामुळे हा रस्ता असून नसल्यासारखा निरुपयोगी असतो. सध्या पावसामुळे सदर रस्ता चिखलाच्या दलदलीने भरून गेला आहे. त्यामुळे पायी जाणे तर दूरच या रस्त्यावरून वाहनांवरून जाणे देखील कठीण झाले आहे. परिणामी लक्ष्मी गल्लीतील स्त्री-पुरुष नागरिक, शालेय मुले अशा सर्वांचीच मोठी कुचंबणा होत आहे.
घरातून बाहेर पडून गावात ये-जा करावयाची झाल्यास येथील नागरिकांना आपले पाय चिखलाने बरबटून घ्यावे लागत आहे. विशेष करून शालेय मुलांचे हाल होत आहेत. रस्त्यावर सर्वत्र चिखलच चिखल असल्यामुळे शाळेला ये-जा करताना मुलांची त्रेधातिरपीट उडत आहे.
एकंदर लक्ष्मी गल्लीतील रहिवाशांना रस्त्यावरील चिखलाच्या दलदलीमुळे घराबाहेर पडणे नकोसे वाटत आहे. सदर रस्त्याचे काम व्यवस्थित पूर्ण करावे यासाठी गेल्या दोन वर्षापासून वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लक्ष्मी गल्ली येथील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.