Saturday, January 18, 2025

/

परिस्थितीशी दोन हात करत मंथनने पटकावले 95 टक्के

 belgaum

घरची परिस्थिती बेताची, वडील ऑटोरिक्षा चालक अशा प्रतिकूल परिस्थितीत एका मुलाने यंदाच्या पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मंथन महेश किल्लेकर असे या विद्यार्थ्याचे नाव असून परीक्षेत 95 टक्के गुण संपादन करून तो गुणवत्तेत उत्तीर्ण झाला आहे.

शहरातील ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या शिवाजीनगर येथील मंथन महेश किल्लेकर याने यंदाच्या पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या परीक्षेत 600 पैकी 566 गुण संपादन केले आहेत. विशेष म्हणजे त्याने गणित विषयात पैकीच्या पैकी म्हणजे 100 गुण मिळविले आहेत. मंथनचे वडील महेश किल्लेकर हे ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. मंथनची आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे सुट्टीमध्ये मंथन पार्टटाइम काम करून अभ्यासही करत असतो.

एकंदर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मंथन किल्लेकर हा बारावीच्या परीक्षेत गुणवत्तेत उत्तीर्ण झाला आहे. मराठी माध्यमातून येऊन त्याने मिळविलेले हे यश आदर्शवत असेच आहे. मंथन याचे प्राथमिक शिक्षण शिवाजीनगर येथील 27 नंबर शाळेत झाले. पुढे माध्यमिक शिक्षण मराठा मंडळच्या सेंट्रल हायस्कूलमध्ये पूर्ण केल्यानंतर त्याने ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रारंभापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून सुपरिचित असणाऱ्या मंथन याने दहावीच्या परीक्षेत 85 टक्के गुण मिळवले आहेत.

बेळगाव लाइव्हशी बोलताना मंथन किल्लेकर याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना आणि स्वतःच्या परिश्रमांना दिले. कॉलेजमध्ये प्राध्यापकांनी जे शिकविले त्याचा घरी स्वतः अभ्यास करून कोणत्याही ट्यूशन अथवा क्लासच्या मदतीविना आपण हे यश मिळविले असल्याचे मंथनने अभिमानाने सांगितले.Puc 2manthan

आज दुपारी राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच मंथनच्या आईवडिलांनी त्याला मिठाई भरवून तसेच शेजाऱ्यांना मिठाईचे वाटप करून आपला आनंद व्यक्त केला. शिवाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक बावडेकर आणि विजय पवार यांनीही प्रत्यक्ष भेटून मंथन किल्लेकर याचे अभिनंदन केले.

घरची परिस्थिती बेताची असताना देखील मराठी माध्यमातून येऊन बारावीच्या परीक्षेत या पद्धतीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मंथन किल्लेकर याचे शिवाजीनगर परिसरात कौतुक होत आहे. एकंदर जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन यश मिळवता येते हेच मंथन किल्लेकर याने दाखवून दिले आहे. त्याचा आदर्श इतरांनी घ्यायला कांहीच हरकत नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.