सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशीच्या वारीसाठी अंकलीकर सरकार शितोळे यांच्या माऊलीच्या अश्वांचे विधिवत पूजेनंतर परंपरेनुसार आज शुक्रवारी अंकलीकर शितोळे सरकारांच्या राजवाड्यातून आळंदीसाठी प्रस्थान झाले.
प्रारंभी आज सकाळी अंकली गावातील श्री विठ्ठल मंदिरातून वारकरी मंडळी विधिवत पूजा करून माऊली अश्वाच्या प्रस्थान कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात दाखल झाले. त्यानंतर राजवाड्यातील श्री अंबाबाई मंदिरमध्ये देवीची आणि जरीपटक्याची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर श्रीमंत युवराज माहादजी राजे शितोळे यांच्याकडे जरीपटका सुपूर्द करण्यात आला.
त्यांनी तो जरीपटका परंपरेनुसार अश्वारोहकाकडे सुपूर्द केला. यावेळी पंचक्रोशीतील वारकरी मंडळी आणि माऊली भक्तांच्या भजन व कीर्तनाच्या गजरात माऊलीच्या अश्वांना निरोप देण्यात आला. तेथून पुढे अश्वांनी अंकली गावाची प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर लवाजम्यासह माऊलीचा अश्व आणि जरीपटक्याचा अश्व हे दोन्ही अश्व आळंदीच्या दिशेने रवाना झाले.
अश्वांच्या प्रस्थान कार्यक्रमाप्रसंगी श्रीमंत सरकार उर्जितसिंह राजे शितोळे अंकलीकर, श्रीमंत युवराज माहादजी राजे शितोळे, श्रीमंत सरकार वीरेंद्रसिंह शितोळे, श्रीमंत राणोजी राजे घोरपडे कापशीकर सरकार, श्रीमंत ननदीकर सरकार, श्रीमंत रमेश रायजादे हरोलीकर सरकार, जुने बेळगाव कलमेश्वर देवस्थान कमिटीचे सेक्रेटरी नारायण खन्नूकर, विक्रम गायकवाड आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, वारकरी आणि भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
विशेष म्हणजे अंकलीकर शितोळे सरकारांच्या राजवाड्यातून माऊली अश्वांचे प्रस्थान होण्याची ही परंपरा तब्बल 190 वर्षांपासून अविरत सुरू आहे. फक्त ब्रिटिश काळात 1919 मध्ये देशातील प्लेगच्या साथीमुळे आणि गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या साथीमुळे या परंपरेत खंड पडला होता. अन्यथा ऐतिहासिक अशीही माऊलीच्या अश्वांची परंपरा आजतागायत अखंड पुढे चालू ठेवण्यात आली आहे.
टाळ मृदुंगाच्या गजरात हिरा मोती अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे बंद असलेला संतांचा पायी वारी पालखी सोहळा यंदा होणार असून या आषाढी वारीत संत ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी टाळ मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत अंकली जि बेळगांव येथून श्रीमंत उर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या हिरा व मोती या दोन अश्वानी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले .
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवार दि २१ जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवीत आहे . या आषाढीवारी पालखी सोहळ्यात श्रीमंत उर्जीतसिंह शितोळे सरकार यांचे दोन अश्व सहभागी होतात . आज ( शुक्रवार ) दि १० रोजी सकाळी १० वाजता या अश्वांची विधीवत पूजा करण्यात आली . टाळ मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत या दिंडी सोहळ्यासमवेत अश्वांनी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले .
तत्पूर्वी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी अंकलीकर राजवाड्यात श्रीच्या अश्वांचे स्वागत करून दर्शन घेतले. त्यांनी यावेळी श्रीमंत शितोळे सरकार यांचे समवेत पालखी सोहळ्याबाबत चर्चा करून पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली. कोरोनानंतर प्रथमच तब्बल दोन वर्षानी पायी वारी पालखी सोहळा निघत असलेने श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांनी समाधान व्यक्त केले . वारीच्या काळात कोणालाही कोरोनाची बाधा होवू नये अशी त्यांनी माऊली चरणी मागणी केली .
अंकली गावातील राजवाड्यातून श्रींच्या अश्वांचे हरीनाम गजरात प्रस्थान झाल्यानंतर अंकली नगर प्रदक्षिणा, महाप्रसाद झाल्यावर मांजरीवाडी, कागवाड मार्गे हा सोहळा म्हैसाळकडे मार्गस्थ झाला . अश्वांचा पहिला मुक्काम मिरज येथे आहे . दि . ११ रोजी सांगली , सांगलवाडी मुक्काम , दि . १२ रोजी तुंग , मिरजवाडी , इस्लामपूर , पेठनाका मुक्काम , दि . १३ रोजी नेर्ले मार्गे वाहगाव मुक्काम , दि . १४ रोजी उंब्रज मार्गे भरतगाव मुक्काम , दि . १५ रोजी सातारा , नागेवाडी , भुइंज मुक्काम , दि . १६ रोजीसुरुर , खंडाळा , सारोळा मुक्काम , दि . १७ रोजी हरिश्चंद्री , वरिये मार्गे शिंदेवाडी मुक्काम , दि. १८ व १९ जून रोजी दोन दिवसांचा पुणे मुक्काम होणार आहे. अश्व आळंदीत सोमवार दि . २० जून रोजी दाखल होणार आहेत . अश्व आल्यानंतर आळंदीच्या वेशीवर अश्वांचे परंपरेप्रमाणे सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार व आळंदी देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पुणे आळंदी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिरात (बिडकर वाडा) सरदार हरप्रीतसिंह बिडकर परिवाराच्या वतीने अश्वांचे स्वागत होणार आहे.
या अश्व प्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे , महादजी शितोळे , हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर , ज्ञानेश्वर गुंळुजकर , निवृत्ती चव्हाण , राहुल भोर , अजित परकाळे , विजय परकाळे , अतुल वाल्हेकर यांच्यासह वारकरी उपस्थित होते .