प्राण्यांसाठी असलेली रक्त संकलनाची पिशवी (ब्लड बँक) उपलब्ध न झाल्या मुळे कांही दिवसापूर्वी ॲनेमिया झालेल्या एका कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये संबंधित ब्लड बॅग्ज उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी काकती येथील ‘हा माझा धर्म’ या संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
हा माझा धर्म संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांसह बेळगाव जिल्हा पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर यांना सादर केले. उपसंचालक डॉ. राजीव कुलेर यांनी निवेदनाचा स्वीकार करून केसरकर यांच्या मागणीचे स्वागत केले. तसेच आपल्या वरिष्ठांशी यासंदर्भात बोलून येत्या चार दिवसात आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
काकती येथील ‘हा माझा धर्म’ ही विनायक केसरकर यांच्या नेतृत्वाखालील संघटना अन्य सामाजिक कार्याबरोबरच प्रामुख्याने प्राण्यांसाठी त्यांचे जीव वाचवण्यासाठी कार्य करत असते. या संघटनेने चार दिवसापूर्वी 7 जून रोजी शरीरातील रक्ताच्या कमीमुळे ॲनेमिया झालेल्या एका कुत्र्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यावेळी प्राण्यांचे रक्त संकलनासाठी असलेली ब्लड बॅग शहर आणि परिसरातील कोणत्याच हॉस्पिटल अथवा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध झाली नाही. अखेर त्या आजारी मरणासन्न कुत्र्याला रक्त देण्यासाठी विनायक केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिपॅरीन लिक्विड युक्त युरीन बॅगचा वापर केला.
तथापि दुर्दैवाने त्याचा उपयोग न होता त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर हा माझा धर्म संघटनेने सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ब्लड बॅग्ज उपलब्ध करून देण्याची उपरोक्त मागणी केली आहे.