पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक तयारी करण्याची गरज आहे. याबाबत योग तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
राज्यात अलीकडे मुलांवर दबाव वाढत आहे. विशेषतः कोरोनानंतर मुलांमध्ये नवनवे दबाव निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही तणावा शिवाय मुलांनी आपले बालपण आनंदात घालविले पाहिजे.
लहान वयातच मुलांच्या आरोग्यासाठी योगासने फायदेशीर ठरतात असे सांगून योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हैसूरला भेट देणार आहेत. त्या दिवशी राज्यात मोठ्या प्रमाणावर शाळा -महाविद्यालय आणि संघ -संस्थांकडून योगा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.