टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोमधील विकास कामांबाबत दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली असून वृक्षतोड न करता तेथील विकास कामे पूर्ण करण्याची मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे भरपाई म्हणून व्हॅक्सिन डेपोमध्ये वृक्ष लागवड करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कांही कामे व्हॅक्सिन डेपो येथे केली जात आहेत. त्याच्याविरोधात राजीव टोपण्णावर व अन्य पर्यावरणप्रेमींतर्फे ॲड. किरण कुलकर्णी व ॲड. सतीश बिरादार यांनी बंगळूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. गेल्या जुलै 2021 मध्ये या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायमूर्ती अभय ओक व सुरज गोविंदराज यांनी व्हॅक्सिन डेपोतील विकास कामे करण्यास अंतरिम स्थगिती दिली होती.
त्याचप्रमाणे सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावल्यामुळे स्मार्ट सिटी योजनेतील त्या ठिकाणची कामे थांबली होती. तसेच स्मार्ट सिटी योजनेतून तेथे सुरू होणारी आणखी काही विकास कामे न्यायालयाच्या आदेशामुळे रखडली होती. स्थगिती उठवण्यासाठी स्मार्ट सिटी विभाग तसेच अन्य प्रतिवादींकडून प्रयत्न सुरू होते, याला आता यश आले आहे.
उच्च न्यायालयाने नुकताचा स्थगिती आदेश उठवून वृक्षतोड न करता विकास कामे करण्यास मुभा दिली आहे. तसेच भरपाई म्हणून व्हॅक्सिन डेपो येथे रोप लागवड करण्याचा आदेशही दिला आहे.
स्मार्ट सिटी योजनेतील कामे 2023 मध्ये पूर्ण करण्याची केंद्र शासनाने डेडलाईन निश्चित केली आहे. यासाठीच व्हॅक्सिन डेपोतील प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आता स्थगिती उठल्याने ती कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. तथापि आता पर्यावरणप्रेमींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.