शिक्षक भरतीसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातील विविध केंद्रांवर शिक्षण खात्याकडून घेण्यात आलेली सीईटी अर्थात सामान्य प्रवेश परीक्षा आज रविवारी यशस्वीरित्या पार पडली.
शिक्षक भरतीसाठी काल शनिवारपासून बेळगाव शहरातील 25 केंद्रांवर सीईटी परीक्षा झाली. मात्र अर्ज करूनही बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 2261 विद्यार्थ्यांनी काल सीईटीला दांडी मारली होती. पहिल्या दिवशी सामान्य व इंग्रजी विषयाचा पेपर झाला. त्यानंतर आज रविवारी सीईटीचे कन्नड व समाज विज्ञान विषयाचे पेपर पार पडले.
सर्व केंद्रांवर परीक्षार्थींची दोन वेळा तपासणी करण्यात आली. तसेच परीक्षाकाळात कोणताही गोंधळ होऊ नये याकडे लक्ष देण्यात आले होते. सीईटीमुळे सकाळी परीक्षेला प्रारंभ होण्यापूर्वी आणि परीक्षा संपल्यानंतर परीक्षा केंद्र परिसरात कालपासून परीक्षार्थींची गर्दी पहावयास मिळत होती.
कांही महिन्यांपूर्वी पीएसआय भरती परीक्षेवेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. तसेच कॉपीचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे यावेळी शिक्षण खात्याने शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या सीईटीप्रसंगी कडक उपायोजना केल्या होत्या. सर्व केंद्र परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता.
बेळगाव शहरातील सरदार्स हायस्कूल, शर्मन इंग्रजी माध्यम शाळा, शर्मन कन्नड माध्यम शाळा, सेंट झेवियर शाळा, मराठी विद्यानिकेतन, वनिता विद्यालय, बेननस्मिथ हायस्कूल, महिला विद्यालय हायस्कूल, महिला विद्यालय इंग्रजी माध्यम शाळा, जी. ए. पदवीपूर्व कॉलेज, एम. व्ही. हेरवाडकर शाळा,
ठळकवाडी हायस्कूल, बालिका आदर्श विद्यालय, डी. पी. हायस्कूल, चिंतामणराव हायस्कूल, गोमटेश हायस्कूल, सिद्धरामेश्वर हायस्कूल आणि लिटल स्कॉलर अकादमी हायस्कूल कणबर्गी या केंद्रांवर आज सीईटी परीक्षा यशस्वीरित्या पार पडली.