जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याबरोबरच त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन आज सोमवारी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले. तसेच शिक्षक भरतीतील अन्याय दूर न झाल्यास ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
खानापूर तालुका म. ए. युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेले निवेदन स्वीकारून तहसीलदारांनी ते सरकारकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले. गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन खर्चाचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. त्यामुळे ही दरवाढ तात्काळ कमी करण्यात यावी. शिक्षक भरती मधील मराठी माध्यमावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल. इयत्ता सातवी उत्तीर्ण होऊन आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित बस बस उपलब्ध करून द्यावेत आणि शाळांना सुरुवात झाल्यामुळे बस व्यवस्था मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
तहसीलदारांप्रमाणे शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमावर झालेल्या अन्याया यासंदर्भात माहिती देणारे आणि हा अन्याय दूर करावा, अशा मागणीचे निवेदन खानापूर गटशिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी धनंजय पाटील यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर तालुक्यातील शिक्षक भरतीत मराठी माध्यमांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती दिली.
मराठी माध्यमांसाठी 200 पेक्षा जास्त शिक्षकांची गरज असताना फक्त 60 जागा ठेवण्यात आल्या आहेत. हा अन्याय आहे. खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमांसाठी पुरेशी शिक्षक भरती करावी, अशा मागणीचे निवेदन शिक्षक भरतीपूर्वी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना देऊन देखील हा अन्याय का? असा सवाल करून येत्या आठ दिवसात यासंदर्भात योग्य ती कार्यवाही न झाल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.
युवा समितीतर्फे खानापूर बस आगार प्रमुखांना देखील शालेय विद्यार्थ्यांच्या बससेवेचे संदर्भातील निवेदन देण्यात आले. निवेदन सादर करतेवेळी खानापूर तालुका म. ए. युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्यासह कार्याध्यक्ष किरण पाटील, पी.एच.पाटील,सुरेश देसाई, बळीराम पाटील, राजू पाटील, राजाराम देसाई, आनंत देसाई, दिनकर मरगाळे,दत्तू कुट्रे,नारायण वाकाले, नागो केसरकर,प्रतीक देसाई,भूपाल पाटील,विशाल बुवाजी,वैराळ सुळकर, नारायण पाटील, स्वागत पाटील,महादेव ऱ्हाटोळकर, आदी उपस्थित होते.