गेली 65 वर्षे सीमा भागातील मराठी जनता त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध झगडत आहे हा लढा आता अंतिम चरणावर आलेला आहे याप्रसंगी समस्त मराठी माणसाने एकत्र येऊन लढ्याची धार तीव्र करण्याची गरज आहे असे प्रतिपादन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले.
बेळगाव तालुक्यातील देसुर येथील बैठकीत मंडलिक बोलत होते.जिल्हा प्रशासनाला इशारा देण्यासाठी सर्वांनी हुतात्म्यांना अभिवादन करत आशीर्वाद घेऊया आणि मराठीचा आवाज बुलंद करू असे मंडलिक यांनी सांगितले.
हुतात्मा दिनी मराठी कागदपत्रांसाठी म ए समितीच्या जनजागृतीसाठी विभागवार बैठका आणि सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काल सोमवारी झालेल्या तालुका समितीच्या बैठकीतील निर्णया प्रमाणे तालुक्यात बैठका घेऊन जनजागृतीला सुरुवात झाली आहे.
मंगळवारी रात्री देसुर मध्ये झालेल्या सभेला देसुर मधील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मार्गदर्शन करताना मराठी माणसांनी कर्नाटक शासनाला शक्ती दाखवण्याची गरज व्यक्त करत 1 जून रोजी हजरोच्या संख्येने हुतात्म्यांना अभिवादन करून मराठी कागदपत्रासाठीचा लढा तीव्र करूया असे आवाहन केले.
बैठकीला माजी ए पी एम सी सदस्य आर के पाटील व महेश जुवेकर, सुनील पाटील, मष्णू पाटील ,नारायण पाटील,रमेश नंध्याळकर, प्रशांत पाटील, नारायण मजुकर नारायण गोरे आदी समितीची नेते मंडळी उपस्थित होती.