बेळगाव शहरातील सुमारे 6000 मोकाट कुत्र्यांची नसबंदी केली जाणार असून या मोहिमेसाठी महापालिकेला तब्बल 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शहरातील प्रत्येक कुत्र्याच्या नसबंदीसाठी महापालिकेला 1650 रुपये खर्च येणार आहे.
भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडून नसबंदीसाठीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. या संदर्भात गेल्या 5 एप्रिल रोजी आदेश बजावण्यात आला आहे. प्राणी कल्याण मंडळाच्या आदेशानुसार नसबंदीसाठी किमान 1650 रुपये इतका दर ठेकेदाराला देणे आवश्यक आहे. मोकाट कुत्र्यांना पकडणे व त्यांना नसबंदी केंद्रात नेण्यासाठी 200 रुपये दर निश्चित केला आहे. हा किमान दर असून त्यापेक्षा कमी दरात हे काम करता येणार नाही. शस्त्रक्रियेपूर्वी कुत्र्यांना देणे आवश्यक असलेली औषधे, खाद्य तसेच शस्त्रक्रिया व त्यानंतरची देखभाल यासाठी एक हजार 450 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
महापालिकेने नसबंदीच्या कामाचा ठेका देण्यासाठी निविदा काढली आहे. त्यात ठेकेदारांनी सहभाग घेतला आहे. दाखल झालेल्या निविदांची तांत्रिक पडताळणी केली आहे. पण त्यांनी नमूद केलेले दर मंजूर करावे की नाही? याबाबत संभ्रम होता. तथापि नव्या दरामुळे महापालिकेचा संभ्रम दूर झाला आहे.
शहरात 2007 साली पहिल्यांदा मोकाट कुत्र्यांची नसबंदी सुरू झाली होती. परंतु कमी दरामुळे ठेकेदारांनी ही मोहीम अर्धवट ठेवली होती. त्यानंतर 2019 मध्ये राबविण्यात आलेली नसबंदी मोहीम देखील शस्त्रक्रिया गृहात पुरेशा सुविधा नसल्याचे कारण देत थांबविण्यात आली होती. पुढे अडीच वर्षे झाली ही मोहीम बंदच आहे. मात्र आता महापालिकेने तातडीने मोकाट कुत्र्यांची नसबंदी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.