कडोलकर गल्लीच्या मागील बाजूस असणाऱ्या बापट गल्ली कार पार्किंगच्या ठिकाणी असलेले भंगी बोळातील मातीने बुजवून गेलेल्या गटारीची युद्धपातळीवर साफसफाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
कडोलकर गल्ली येथील युनिव्हर्सल बॅग या दुकानाच्या मागील बाजूस बापट गल्ली कार पार्किंग आहे. या कार पार्किंगच्या ठिकाणी श्री दत्त मंदिर आणि श्री विठ्ठल -रुखुमाई मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजूस जवळपास 6 महिन्यांपूर्वी महापालिकेकडून कूपनलिका अर्थात बोर खोदण्यात आली आहे.
सदर कूपनलिकेसाठी खोदण्यात आलेल्या मातीची वेळीच उचल करण्यात आली नसल्यामुळे अलीकडे पडलेल्या पावसामुळे सदर माती नजीकच्या भंगी बोळातील गटारात वाहून जाऊन गटार बुजून गेली आहे.
गटार बुजल्यामुळे या ठिकाणी सांडपाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या गटारातील माती आणि गाळ काढून साफसफाई केली जावी, याबाबत महापालिकेकडे वेळोवेळी मागणी व विनंती करून देखील अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
सदर गटारीची साफसफाई न झाल्यास भविष्यात जोरदार पावसामुळे भंगी बोळातील सांडपाणी मागील बाजूने कडोलकर गल्लीतील दुकानांमध्ये शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष देऊन कडोलकर गल्ली मागील बाजूस असलेल्या भंगी बोळातील गटारीची तात्काळ पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी युनिव्हर्सल बॅगचे संचालक विनायक श्रेयेकर यांच्यासह कडोलकर गल्लीतील अन्य दुकानदार व व्यावसायिकांनी केली आहे.