आज मी जो काही आहे तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्यामुळे असे सांगून सीमाप्रश्नी अखेरच्या श्वासापर्यंत मी माझ्या सीमावासीय मराठी बांधवांच्या पाठीशी ठाम उभा राहीन, असा संदेश महाराष्ट्र राज्य सभेतसाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून नाव निश्चित झालेले कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी शिवसेनेने आपले अधिकृत उमेदवार म्हणून कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नांव निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हने पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते. संजय पवार म्हणाले की, गेल्या 30 वर्षात एक सर्वसामान्य शिवसेना शाखा प्रमुख पदापासून अनेकपदे मी भूषवली असून आज कोल्हापूर जिल्हा प्रमुख आहे. मध्यंतरी 15 वर्ष मी नगरसेवक देखील होतो.
शिवसेनेचा शहर प्रमुख आणि तालुकाप्रमुख म्हणून कार्य केल्यानंतर आज 14 वर्षे झाले मी कोल्हापूरचा शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत आहे. एका जबाबदार महामंडळावर अण्णासाहेब पाटील यांनी मला उपाध्यक्षपदीही संधी दिली.
ही सर्व किमया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासह सर्व शिवसैनिक आणि जनतेच्या आशीर्वादामुळे घडू शकली. आज मी जो काही आहे तो या सर्वांमुळे आहे. हे फक्त शिवसेनेतच घडू शकते.
माझ्या उत्कर्षासाठी मी माझ्या हितचिंतकांना धन्यवाद देतो असे सांगून सीमावासीय हे माझे मराठी बांधव आहेत. सीमाप्रश्नी मी त्यांच्या पाठीशी शेवटच्या श्वासापर्यंत ठाम उभा राहीन, असे कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे राज्यसभेचे संभाव्य उमेदवार संजय यांची प्रतिक्रिया@sanjaypowar@belgaumlive pic.twitter.com/d5iDxhillx
— Belgaumlive (@belgaumlive) May 25, 2022