ऐतिहासिक परंपरा असणारी बेळगावमधील शिवजयंती चित्ररथांची मिरवणूक आज गुरुवारी सकाळपर्यंत चालली. वैविध्यपूर्ण पारंपरिक देखावे यामुळे ही मिरवणूक लक्षवेधी ठरली असली तरी पहाटेच्या दरम्यान पोलिसांच्या बडग्यामुळे या मिरवणुकीला नाही म्हंटले तरी गालबोट लागले.
सुरू असलेली चित्ररथ मिरवणुक पोलिसांनी पहाटे 6 नंतर बंद पाडताना बऱ्याच चित्ररथांना मुख्य मिरवणुकीत सहभागी होऊ न देता ते परस्पर वळवले आणि ज्या मंडळांचे डॉल्बी होते त्यांच्यावर कारवाई करत सौम्य लाठीचार्ज केला. या प्रकारामुळे मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींचा हिरमोड झाला.
शिवकालीन सजीव देखावे, ढोल-ताशांचा अखंड गजर आणि शिवप्रेमी नागरिकांची अलोट गर्दी अशा उत्साही वातावरणात काल बुधवारी सायंकाळी सुरू झालेली बेळगावची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आज सकाळी शांततेत पार पडली. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षाच्या खंडानंतर बेळगावची पारंपारिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे अमाप उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
तथापि मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी. यासाठी पोलिस प्रशासनाने सर्व शिवजयंती उत्सव मंडळांना कांही अटी घातल्या होत्या. त्यापैकी प्रमुख अट म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत मिरवणुकीची सांगता झाली पाहिजे.त्यानंतर कोणताही चित्ररथ सुरू ठेवता कामा नये.
सदर अट मान्य करून काल बुधवारी सायंकाळी चित्ररथ मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ झाला असला तरी आज सकाळी 6 वाजेपर्यंत मिरवणूक सुरूच होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सकाळी सहानंतर कारवाईला सुरुवात करताना मिरवणूक आटोपती घ्यावी अश्या सूचना केल्या.अखेर पूर्ण मिरवणूक संपायला 8 वाजले.