बेळगाव येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने रविवारी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श विद्या मंदिर हायस्कूल वडगाव येथे रविवारी सकाळी 11 वा होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून मैदानावर भव्य अशा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.
बेंगलोरच्या गोसाई मठाचे श्री श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास नूल गडहिंग्लज येथील रामनाथ गिरी समाधी मठाचे भगवान गिरी महाराज तसेच काशीच्या परमार्थ साधक संघाचे स्वामी सोहम चैतन्यपुरी वेदांताचार्य महाराज आणि कोल्हापूरचे छत्रपती शिवरायांचे वंशज श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या सर्वांचा भव्य सत्कार आणि त्यांचे मार्गदर्शन असा हा कार्यक्रम आहे .विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्रित करून समाजाच्या समस्या सोडवून घेता याव्यात हा या मागचा एक उद्देश आहे
*शोभायात्रा*
या गुरुवंदना कार्यक्रमापूर्वी सकाळी नऊ वाजता या सर्व स्वामीजींची सजवलेल्या रथातून छत्रपती शिवाजी उद्यानापासून शोभायात्रा काढण्यात येणार
आहे. या शोभायात्रेत झांज पथक , सजवलेला हत्ती आणि त्या हत्तीवर अंबारीत छत्रपती शिवाजी महाराज आरूढ झालेले असतील. याबरोबरच घोडे ,लेझीम पथक, भजनी मंडळे आणि डोक्यावर कलश घेऊन निघालेल्या महिला यांचा समावेश राहणार असून हा लवाजमा जल्लोषात शहापूर खडेबजार रोडवरून, नाथ पै सर्कल मार्गे वडगाव रस्ता, रेणुका हॉटेलकडून आदर्श विद्यामंदिर मैदानावर पोहोचणार आहे.
या शोभायात्रेत तसेच गुरुवंदना कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
*पार्किंगची व्यवस्था*
या गुरुवंदना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आदर्श विद्या मंदिरकडे येणाऱ्या वाहनधारकांसाठी पार्किंगची व्यवस्था तीन वेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे. आर पी डी मार्गावरून येणाऱ्यांनी आपल्या गाड्या गोमटेश विद्यापीठाच्या आवारात पार्क कराव्यात. येळूर, हलगा, निलजी वगैरे भागातून येणाऱ्या वाहनधारकांनी आपल्या गाड्या जेल शाळेच्या आवारात पार्क कराव्यात. शोभायात्रेत आणि नंतर संपूर्ण कार्यक्रमात स्वयम् शिस्त पाळावी. अशी विनंती करण्यात आली आहे
*भोजनाची व्यवस्था*
गुरुवंदना कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आदर्श विद्यामंदिर कडून शहापूर कडे येणाऱ्या मार्गावर करण्यात आली आहे. दुचाकी वाहने आदर्शनगर च्या विविध क्रॉसवर एका बाजूने पार्किंग करता येणे शक्य आहे