अथणी येथील रेणुका शुगर्स साखर कारखान्याच्या चौथ्या युनिटमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील पिकांचे नुकसान होण्यासह कालवे दूषित होऊन मासे व जनावरे दगावत असल्याच्या निषेधार्थ संतप्त कोकटनुर ग्रामस्थांनी आज सोमवारी बेळगावात आंदोलन छेडून कारवाईची मागणी केली.
अथणी तालुक्यातील कोकटनुरसह आसपासच्या परिसरात असणाऱ्या चार -पाच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अथणी येथील रेणुका शुगरच्या चौथ्या युनिटमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे आसपासच्या भागातील पाण्यांच्या कालव्यासह विहिरींचे पाणी दूषित झाले आहे.
यामुळे कालव्यातील असे मृत होण्याबरोबरच जनावरे दगावण्याचे प्रकार घडत आहेत. परिसरातील शेती पिकांचे नुकसान होत आहे. एकंदर रेणुका शुगरच्या दूषित पाण्यामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत. याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज सोमवारी बेळगावमध्ये आंदोलन छेडून कारवाईची मागणी केली.
यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे नेते राजकुमार टोपण्णावर यांनी साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होऊन देखील त्याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दल तीव्र खेद व्यक्त केला. संबंधित भागातील लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करताना त्यांनी तात्काळ रेणुका शुगर्स कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
आंदोलकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना रेणुका शुगर्समधून बाहेर सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे शेत पिकांचे नुकसान होत असून जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आज आसपासच्या कालव्यातील मासे मृत्यूची पडत असून अनेक जनावरेही दगावली आहेत.
या खेरीज इतरही अनेक समस्या उद्भवल्या आहेत असे सांगून येत्या 10 दिवसात सदर कारखान्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.