चार दिवसांपासून वातावरणात बदलासह वळीव पाऊस हजेरी लावत असल्यामुळे भाजीपाला काढणी ठप्प होण्याबरोबरच भाजीपाला खराब झाला आहे. परिणामी भाजीपाला दरात पुन्हा वाढ झाली असून किरकोळ बाजारात टोमॅटो दर तब्बल 100 रुपयांवर पोचला आहे. इतर भाज्यांच्या दरातही वाढ झाल्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
शहरात बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आणि जय किसान होलसेल भाजी मार्केट ही दोन मार्केट आहेत. तालुक्याच्या पश्चिम, पूर्व भागासह महाराष्ट्रातील कोल्हापूर, कराड, सातारा, पुणे येथून याठिकाणी टोमॅटो व भाजीपाला येतो. त्याचप्रमाणे गोवा व अन्य भागात बेळगावातून भाजीपाल्याची निर्यात होते.
या दोन्ही भाजी मार्केटमध्ये सध्या टोमॅटो 80 रुपये किलो असला तरी किरकोळ बाजारात त्याचा दर 100 रु. प्रति किलो झाला आहे.
लालभाजीही शेकडा 600 रुपयावरून 800 रु. झाली आहे. मेथी 1700 रुपयांवरून 2000 रु., कोथिंबीर 1200 रुपयांवरून 2000 रु., शेपू 600 वरून 800 रु., कांदापात 600 रु., दहा किलो ढबु मिरची 500 ते 600 रु.,
कोबी 40 ते 50 रुपयावरून 140 रु., मिरची 250 रुपयांवरून 450 रु., वांगी 200 रुपयांवरून 300 रु., भेंडी 250 रु. व दोडकी 300 रु. या पद्धतीने सध्या भाजीपाल्याचे भाव आहेत.